विठ्ठल मंदिरात महाद्वार काला
By Admin | Published: July 21, 2016 05:07 AM2016-07-21T05:07:04+5:302016-07-21T05:07:04+5:30
विठ्ठल नामाचा जयघोष व गुलालाची उधळण करीत हजारो भक्तांनी महाद्वार काल्याचा उत्सव साजरा केला.
पंढरपूर : विठ्ठल नामाचा जयघोष व गुलालाची उधळण करीत हजारो भक्तांनी महाद्वार काल्याचा उत्सव साजरा केला. या नंतर खऱ्या अर्थाने आषाढी वारीची सांगता झाल्याचे मानले जाते.
वारकरी संप्रदायात काल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथील हरिदास घराण्यात महाद्वार काल्याची परंपरा आहे. गोपाळपूरच्या काल्यानंतर महाद्वार काला होतो. येथील हरिदास घराण्यात जवळपास ४०० वर्षांपूर्वी पांडुरंग महाराज हे संत होऊन गेले, तेव्हापासून काल्याची परंपरा सुरू आहे.
यामध्ये संत नामदेव महाराज यांच्या वंशजांना मोठा मान आहे. पांडुरंग महाराज यांचे अकरावे वंशज मदन महाराज हरिदास सध्या गादीचे मानकरी आहेत. बुधवारी दुपारी बारा वाजता मदन महाराज यांच्या डोक्यावर पुजाऱ्यांनी पादुका पागोट्यांनी बांधल्या. यानंतर, हजारो भाविकांच्या उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सभा मंडप येथे दहीहंडी ठेवून काल्याचा प्रसाद वाटण्यात आला. (प्रतिनिधी)
>काल्याच्या मिरवणुकीने सांगता
विठ्ठल मंदिरानंतर हा काल्याचा उत्सव चंद्रभागा नदी, माहेश्वरी धर्मशाळा, आराध्ये गल्ली, हरिदास वेसमार्गे काल्याची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी हजारो भाविकांना लाह्या, दही, दुधापासून बनविलेला काला वाटण्यात आला.