वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासकीय महापूजेवेळी विठ्ठल मंदिरात मुखदर्शन सुरू राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 12:49 PM2023-06-24T12:49:13+5:302023-06-24T12:50:05+5:30
Ashadhi Ekadashi 2023: राज्य सरकारच्या या निर्णयाचे वारकरी संप्रदायातून जोरदार स्वागत होत असल्याचे सांगितले जात आहे.
Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीचा उत्साह वारकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. आषाढी वारीनिमित्त वारकरी एक एक टप्पा पंढरपूरकडे सरकत आहे. विठुरायाच्या दर्शनाची आस दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यातच आता वारकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. यंदाच्या वर्षीपासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेवेळी विठ्ठल मंदिरात मुखदर्शन सुरू राहणार आहे. हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय महापूजेच्या चार तासांपूर्वीच दर्शनाची रांग बंद करण्यात यायची.
आषाढी एकादशीसाठीपंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. शासकीय महापूजेच्या चार तासांपूर्वीच दर्शनाची रांग बंद करण्यात येत होती. त्यामुळे आलेल्या लाखों वारकऱ्यांची मोठी गैरसोय होत असे. रांगेतील कालावधी चार तासांनी वाढायचा. त्यामुळे वारकऱ्यांना विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी फार वेळ लागत असे. ही गैरसोय टाळण्यासाठी आषाढी एकादशीला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने ही खुशखबर दिली आहे.
आषाढी सोहळ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी व्यवस्था
आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पहाटे अडीच वाजता पूजेला येत असतात. जवळपास पहाटे पाचपर्यंत विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा आणि सत्कार कार्यक्रम मंदिरात होत असतो. यावेळी आषाढी सोहळ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी व्यवस्था केल्याने पर्वणी काळात जवळपास दीड ते दोन लाख भाविकांना देवाचे मुखदर्शन होणार आहे. आषाढी एकादशी दिवशी दर्शन मिळावे यासाठी ३०-३० तास भाविक दर्शन रांगेत उभे असतात. राज्यभरातील आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते व्हीआयपी बनून दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत असतात. राज्य सरकारच्या या निर्णयाचे वारकरी संप्रदायातून जोरदार स्वागत होत आहे.
दरम्यान, हा निर्णय जाहीर केल्याने आषाढी एकादशीला केवळ दर्शन रांगेतील भाविकांनाच देवाचे दर्शन घेता येणार आहे. याचसोबत आषाढी एकादशीला मानाच्या दिंड्यांचे देण्यात येणाऱ्या दर्शन पासेसशिवाय कोणतेही व्हीआयपी दर्शन पासेस वितरित करू दिले जाणार नसल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले आहे. यामुळे दर्शन रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना पहाटेची शासकीय महापूजा संपल्यानंतर दिवसभर विठुरायाचे दर्शन पर्वणी काळात घेता येणार आहे.