विठ्ठलाची विराजमान मूर्तीच मूळ : डॉ.गो.बं देगलूरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 01:48 PM2019-07-01T13:48:18+5:302019-07-01T13:49:46+5:30
पंढरपुरचा ‘विठ्ठल’ म्हणजे महाराष्ट्राचे आराध्यदैवत. पण या पांडुरंगाच्या मूर्तीबददल अनेक मिथ्थके ऐकायला मिळतात. त्यामागचे नक्की सत्य काय आहे? हे जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक आणि मंदिरस्थापत्य तज्ञ डॉ. गो.बं देगलुरकर यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद.
- नम्रता फडणीस
* पांडुरंग ही लोकदेवता आहे. मात्र पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मूर्तीबाबत मतमतांतरे आहेत. असे का ?
- महाराष्ट्राचे मुख्य दैवत म्हणून पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाकडे पाहिले जाते. संत ज्ञानेश्वर ते संत तुकारामांपर्यंत अनेक संतांनी पांडुरंगाचे वर्णन करणा-या अनेक रचना केल्या आहेत. पण हे ही तितकेच खरे आहे की या मूर्तीबददल लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत, ही मूर्ती विष्णुची की श्रीहरिहराची? हिचे दोन्ही हात कटिस्थित का? काहींच्या मते ही मूर्ती बुद्धाची आहे तर आणखी काही जणांचे म्हणणे आहे की आज पंढरपूर येथील गाभा-यात जी मूर्ती आहे ती मूळची नाही. मूळची मूर्ती अन्यत्र हलविली गेली आहे. मात्र हे सर्व प्रश्न गैरसमजातून आणि मूर्तीशास्त्राविषयीच्या अज्ञानातून निर्माण झाले आहेत.
* मग मूर्तीचा खरा इतिहास काय ?
_- श्रीविठ्ठल महाराज सहाव्या शतकापासून पंढरीत आहे. जिची उपासना आजही चालू आहे. कारण या मूर्तीच्या ठेवणीतून आणि अलंकारातून त्या काळाची कल्पना येते. उदा: मूर्तीच्या कानातील मकरकुंडल या काळातील शिल्पातून आढळतात. दोन्ही हात कटिस्थानी असल्याच्या विष्णुमूर्ती पाचव्या शतकातील विदिशाजवळील (मध्यप्रदेश) उदयगिरी लेणीत आहेत. ही मूर्ती विष्णुची आहे. हिच्या हातात शंख आहे. कुषाण काळात म्हणजे इसवी तिस-या व चौथ्या शतकात अशा मूर्ती पाहायला मिळतात. संत निवृत्तीनाथ आणि संत नामदेव या मूर्तीचे वर्णन ‘चोविसा मूर्तीहूनी वेगळा हा पंचविसावा’ असे करतात. हिच्या हाती जो मुकुट आहे तो शिवाच्या पिंडीच्या आकाराचा आहे. हे लक्षात न घेता ती शिवपिंडच आहे, अशा गैरसमजूतीतून ’शिवाकार मुकुट कस्तुरी भाळी’ असे हिचे अठराव्या शतकात वर्णन केले गेले . तिला हरिहर मानले गेले आहे. मुळातच ही विठ्ठलाची मूर्ती ही योगमूर्ती आहे. ती उभी आहे म्हणून स्थानापन्न आहे. ज्ञानेश्वरांनी ‘ऐसा हा योगीराज तो विठ्ठल मज उजु’ असे प्रथम सांगितले होते.
* मूळ मूर्ती अन्यत्र हलविली गेली. यामध्ये कितपत तथ्य आहे?
- श्रीविठ्ठलाची मूर्ती हलविली गेली होती हा इतिहास सांगतो. जे खरं आहे. परकीय नृशंस आक्रमणापासून मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून ती एक ते दोन वेळा सुरक्षित स्थळी हलविली गेली होती. पण योग्यवेळी ती परत आणण्यात आली आणि तिची मंदिरात पुनसर््थापनाही करण्यात आली होती. हे इतिहासाने सिद्ध केले आहे. डॉ. ग.ह खरे यांनी यासंबंधीची माहिती विस्ताराने आणि पुराव्याधारित ‘महाराष्ट्राची चार दैवते’ या पुस्तकात दिली आहे. ही मूर्ती माढा(जि.सोलापूर) येथे हलविली गेल्याचे सांगोवांगी इतिहासात आलेली गोष्ट आहे. मात्र इतिहासाचा कोणताही आधार त्याला नाही. पंढरपूरजवळ ‘देगाव’ नावाचे गाव आहे. तिथल्या बडव्यांनी संकटाच्या वेळी तिथल्या पाटील किंवा ग्रामपंचायतीला दिली. ती नेऊन दिल्याची आणि परत आणल्याची पावती आहे. हे खरे यांनी पुस्तकातही नमूद केले आहे. देगाव च्या ऐवजी कुणीतरी माढे म्हणाले असेल. सध्याची पंढरपूरची मूर्ती आधीही तिथे तशीच्या तशी असणार. ती बदलायची झाली तरी ती तशीच्या तशीच करा असे कारागिराला सांगितले जाते.
* माढा येथील मूर्ती आणि पंढरपूरमधील मूर्तीमध्ये कोणता फरक आहे?
- पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती पाहिली की लक्षात येईल ती माढ्याच्या मूर्तीपेक्षा खूप जुनी आहे. पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये ‘मकरकुंडल’ आहेत तर माढ्याच्या मूर्तीत ’शंखकुंडल’ आहेत. ‘कांसे पितांबर’ अशी ती नाही. माढ्याची मूर्ती नग्न आहे. त्या मूर्तीच्या हातात जी काठी आहे तशी पंढरपूरच्या मूर्तीत नाही. त्यामुळे पंढरपूरची पांडुरंगांची मूर्ती मूळ मूर्ती प्रमाणेच घडविली आहे, माढ्याला हलविण्याचे काहीच कारण नाही.
* पांडुरंगाची मूर्ती जर विष्णुची आहे तर त्याचा ’विठ्ठल’कसा झाला?
-विष्णुचे अपभ्रष्ट रूप हे विठ्ठु होते. त्याला इतिहासाचा एक पुरावा आहे. चेन्नईमध्ये व्यंगीचे राज्य होते. तिथे पुलकेशन हा बदामीच्या चालुक्याचा राजा होता. त्याने विष्णुवर्धन या आपल्या भावाला राज्य दिले. त्याला कुब्ज विष्णुवर्धन म्हटले जायचे. त्या विष्णुवर्धनबददलचे जे शिलालेख आहेत त्यात काही वेळा ‘‘विटटू’, ‘विठू’ असे काहीसे भ्रष्ट रूप आलेले आहे. थोडक्यात विष्णुचे ‘विठठू’ झाले आणि त्याला पुढे ‘ल’ लागला. विष्णु हा विठ्ठल रूपात आलेला आहे हे यातून स्पष्ट होते. विष्णुची मूर्ती पंढरपूरातही स्थापन झाली आणि त्याचा ‘पांडुरंग’ आणि ‘विठ्ठल’ झाला.
* शास्त्र आणि लोककथा यात कमालीचा फरक जाणवतो, असे का?
-कारण शास्त्र आणि लोककथा यात मुळातच फरक आहे. लोककथेत सत्याचा अंश असतो जो ऐतिहासिक सत्याशी सुसंगत नसतो. लोककथेमधूनच रूख्मिणी आली मग दिंडीर वनात रूसून बसली. ती आली मग तिच्या मागे कृष्ण आला तो तिथेच थांबला. रूख्मिणी रूसून जाण्यापर्यंत कृष्णाने काय केले असेल. मग त्याची रूपं आपणच पाहायला लागतो. संताच्या अभंगामध्येही पांडुरंगाला कृष्ण संबोधले आहे. विठठल रूख्मिणी हे गृहीतचं े धरल्यामुळे रूख्मिणीचे वेगळे मंदिर उभारण्याची काहींना गरजच वाटत नाही. पंढरपूरमध्ये मात्र वेगळे आहे.
* इतिहास सोयीने बदलला जातो ,असे वाटते का?
- परंपरेने एकच विचार पुढे येतो तेव्हा दुसरा विचार रूजायला वेळ लागतो. ३३ कोटी देव म्हटले जाते; पण खरे ३३ प्रकारचे देव आहेत. जाणकारांना हे सांगितले तर पटते; पण सामान्य लोकांच्या पचनी पडत नाही. अभ्यासकांना माहिती असूनही लोकांच्या श्रद्धेला तडा जाऊ नये म्हणून कोणी बोलत नाही.
--------------------------------------------------------