विठु माझा लेकुरवाळा; संगे विक्रमी भक्त मेळा! वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डमध्ये आषाढी वारीची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 03:28 AM2018-03-01T03:28:03+5:302018-03-01T03:28:03+5:30
सर्वसामान्यांचा देव म्हणून ख्याती असलेला पंढरपूरचा सावळा विठुराया हा भक्तांच्या भेटीसाठी आसुसलेला लेकुरवाळा देव असून, विठुरायाच्या दर्शनासाठी येणा-या भक्तांच्या संख्येने जागतिक विक्रम केला आहे.
सोलापूर : सर्वसामान्यांचा देव म्हणून ख्याती असलेला पंढरपूरचा सावळा विठुराया हा भक्तांच्या भेटीसाठी आसुसलेला लेकुरवाळा देव असून, विठुरायाच्या दर्शनासाठी येणा-या भक्तांच्या संख्येने जागतिक विक्रम केला आहे. आषाढी वारीला येणा-या भक्तांची संख्या ही जगात विक्रमी असल्याचे आढळून आले असून त्याची नोंद ‘वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्ड’ मध्ये करण्यात आल्याचे प्रमाणपत्र नुकतेच विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीला प्राप्त झाले आहे.
आषाढी- कार्तिकी विसरू नका, मज देव गुज सांगतसे ! या अभंगाप्रमाणे पांडुरंग हा भक्तीचा अन् भक्तांचा भुकेला आहे. त्यामुळे पंढरीचा वारकरी कधीच आपला नेम चुकू देत नाही. आषाढी वारीसाठी आवर्जुन येणारा वारकरी हा ऊन,वारा पावसाची तमा न बाळगता वारीला येतोच. त्यामुळे या दोन्ही वारीसाठी येणा-या वारक-यांची संख्या काही लाखांमध्ये असते. एका दिवसात भेट देणारे सर्वाधिक भाविक म्हणून आषाढी वारीसाठी आलेल्या भाविकांची याद्वारे नोंद घेण्यात आली आहे. ही संख्या जागतिक पातळीवर विक्रमी असल्याचे इंग्लंच्या इंडो-ब्रिटीश कल्चरल फोरमच्या पाहणीत आढळून आले आहे. या संस्थेने पंढरपूर मंदिर समितीला विक्रमाची नोंद केल्याचे प्रमाणपत्र दिले असून, त्यावर इंग्लंडचे खासदार वीरेंद्र शर्मा, संस्थेचे चेअरमन डॉ. दिवाकर सुकुल यांच्या स्वाक्षºय आहेत. या विक्रमाची पडताळणी करण्याचे काम परमेश्वर पाटील या मराठी माणसाने केले आहे.