विवेकाच्या विचारांना बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:24 AM2018-08-20T01:24:51+5:302018-08-20T01:25:16+5:30

डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतरची ५ वर्षे; सलग ६० महिने निदर्शने, चळवळीकडे ओघ वाढला

Viveka's ideas are strong | विवेकाच्या विचारांना बळ

विवेकाच्या विचारांना बळ

Next

पुणे : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन चळवळीचे (अंनिस) संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनानंतर त्यांचे मारेकरी पकडले जावेत यासाठी अंनिसने सलग ६० महिने राज्यभर मोर्चे, निर्देशने, मॉर्निंग वॉक, सभा या माध्यमातून पाठपुरावा केला. त्याचबरोबर अंनिसच्या चळवळीचे विवेकी विचार पुढे नेण्यासाठी विविध पातळयांवर प्रयत्न केले. त्यातून राज्यभरातील तरूण-तरूणींचा ओघ चळवळीकडे मोठयाप्रमाणात वाढला आहे.
महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीची पहिली शाखा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ९ आॅगस्ट १९८९ रोजी पुण्यातील आपटे प्रशालेमध्ये सुरू केली. साधना मिडीया सेंटर येथे दर सोमवारी होणाऱ्या अंनिस पुणे शहर शाखेच्या साप्ताहिक बैठकीला ते नियितपणे उपस्थित रहायचे. ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी कर्वे पुलावर २० आॅगस्ट २०१३ रोजी मॉर्निंग वॉकला गेले असताना डॉ. दाभोलकर यांचा गोळया झाडून खून करण्यात आला. चळवळीचे महत्त्वाचे आधारस्तंभ असलेल्या नेतृत्त्वाच्या खूनाच्या घटनेने अंनिसच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. डॉ. दाभोलकर मांडत असलेल्या विचारांचा प्रसार थांबविण्याच्या हेतूने त्यांचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट होते. दाभोलकरांचे मारेकरी व त्यापाठीमागचे मास्टरमार्इंड जोपर्यंत पकडले जात नाहीत तोपर्यंत महाराष्टÑातील व देशातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या जीवाला असलेला धोका कायम राहणार आहे. त्यामुळे त्यांच्या मारेकºयांना पकडण्यासाठी गेली ५ वर्षे अंनिसकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. दरम्यानच्या काळात कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांचे खून झाले. त्यामुळे दाभोलकर यांच्या खूनानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली शंका खरी ठरली. त्यामुळे या सर्वांचे मारेकरी पकडले जावेत यासाठी राज्यभर सातत्याने निर्दशने करण्यात आली.
पुण्यातील महर्षी कर्वे पुलावर प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला निर्देशने करण्यात आली. इतर शहरांमध्ये जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले जात होते, काही ठिकाणी मॉर्निंग वॉक काढून मारेकºयांना पकडण्याची मागणी करण्यात आली. नाशिकमध्ये व्याख्यानमाला भरवून याबाबत प्रबोधन करण्यात आले.
अंनिसच्या माध्यमातून डॉ. दाभोलकर असे काय विचार मांडत होते म्हणून त्यांचा खून करण्यात आला हे समजून घेण्यासाठी तरूण-तरूणींचा ओघ मोठयाप्रमाणात चळवळीकडे आला. सध्या राज्यभरातील अंनिसच्या शाखांची संख्या ३५० च्या पुढे गेली आहे. बाबा बुवांचा पर्दाफाश, शोषण करणाºया अंधश्रध्दांच्या विरोधात गुन्हे दाखल करणे, व्याख्यान, चमत्कारांचे सादरीकरण यातून प्रबोधन आदी उपक्रमांमधून चळवळीचे काम सातत्याने पुढे नेले जात आहे.

‘तसे’ काहीही घडताच पहिला फोन अंनिस कार्यकर्त्यांना
अंधश्रध्देच्या नावाखाली बाबा बुवांकडून फसवणूक केली जात असल्यास, करणी-भानामती सारखी तक्रार असल्यास, त्याचबरोबर इतर कुठल्याही प्रकारे अंधश्रध्दा पसरविण्याचा प्रयत्न होत असल्यास त्याविरोधात लगेच अंनिसच्या कार्यकर्त्यांकडे लोक धाव घेऊ लागले आहेत.
जादूटोणा विरोधी कायद्याच्या मदतीने असे प्रकार थांबविण्याचा पूर्ण प्रयत्न अंनिसच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो. त्याचबरोबर जटनिर्मुलन, चमत्कारांचे सादरीकरण, व्याख्यान, चर्चासत्र यामाध्यमातूनही प्रबोधनाचे काम कार्यकर्ते करीत आहेत.

जादूटोणाविरोधी कायद्यामुळे लढयाला मोठे बळ
जादूटोणा विरोधी कायदा व्हावा यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासह अंनिसच्या अनेक कार्यकर्त्यांनी सलग १८ वर्षे लढा दिला. डॉ. दाभोलकरांच्या खूनानंतर मात्र खडबडून जागे झालेल्या राज्य शासनाने अध्यादेश काढून जादूटोणा विरोधी कायदा तातडीने लागू केला.
या कायद्यान्वये राज्यात ४०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. कायदा मंजूर करण्याची मागणी करताना याबाबत अनेक गैरसमज पसरविले जात होते. मात्र त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर हे सर्व गैरसमज खोटे असल्याचे आपोआप स्पष्ट झाले. या कायद्यामुळे अंधश्रध्दा विरोधातील लढयाला मोठे बळ मिळाले आहे.

पर्यावरणपूरक उपक्रमांना मोठी चालना
गणेश मुर्तींचे नदी, तलाव, विहीरींमध्ये विसर्जन केल्याने पाण्याचे स्त्रोत मोठयाप्रमाणात प्रदूषित होत असल्याने कृत्रिम हौदात, घरच्या घरी विसर्जन करण्याचे आवाहन १९९५ मध्ये अंनिसच्यावतीने करण्यात आले. याला गेल्या काही वर्षांमध्ये राज्यभर खूपच चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
अगदी पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनीही कृत्रिम हौदात विसर्जन करून चळवळीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याचप्रमाणे फटाकेमुक्त दिवाळी या उपक्रमामुळे दिवाळीत फटाके उडविण्याचे प्रमाण लक्षणियरित्या घटत असल्याचे दिसून येते.

इतर राज्यातही अंनिसच्या विचारांचा प्रसार
महाराष्टÑा पाठोपाठ कर्नाटक राज्यातही जादूटोणा विरोधी कायदा करण्यात आला आहे. त्यासाठी कर्नाटकचे तत्कालीन कायदामंत्री जयचंद्रन यांनी अंनिसच्या पदाधिकाºयांची भेट घेऊन या कायद्याची सखोल माहिती घेतली होती. त्याचबरोबर आता केंद्रानेच हा कायदा करावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशात ठिकठिकाणी विवेकवादी संघटनांकडून डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतीदिन २० आॅगस्ट हा दिवस वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दाभोलकरांची पुस्तके, भाषणे यांचे इतर अनेक भाषांमध्ये भाषांतर केले जात आहे.
- मिलिंद देशमुख, राज्य प्रधान सचिव, अंनिस

Web Title: Viveka's ideas are strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.