गौरी लंकेश यांच्या हत्येविरोधात कलाकारांचा आवाज, म्हणाले मुर्दाडपणे जगण्यापेक्षा बोलायलाच हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 03:44 PM2017-09-07T15:44:35+5:302017-09-07T16:06:33+5:30
‘सात नसेल पण निदान एका गोळीची तरी मी तयारी ठेवायला हवी नं ?’, ‘बोलल्याने हत्या होणार असेल आणि न बोलता मुर्दाड जिणं जगायचं असेल तर मला बोलायलाच हवं’, ‘अज्ञातांकडून आणखी एका पुरोगामी आवाजाचा अंत’ अशा स्वरुपात कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करुन संतापाला वाट करुन दिली आहे.
- प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे, दि. ७ - ‘सात नसेल पण निदान एका गोळीची तरी मी तयारी ठेवायला हवी नं ?’, ‘बोलल्याने हत्या होणार असेल आणि न बोलता मुर्दाड जिणं जगायचं असेल तर मला बोलायलाच हवं’, ‘अज्ञातांकडून आणखी एका पुरोगामी आवाजाचा अंत’ अशा स्वरुपात कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करुन संतापाला वाट करुन दिली आहे. गौरी लंकेश यांची हत्या ही दुर्देवी आणि संतापजनक घटना असून, समाज कोणत्या दिशेने चालला आहे, याबाबत कलाकारांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका गौरी लंकेश यांची मंगळवारी राहत्या घरी अज्ञात हल्लेखोरांनी सात गोळया झाडून हत्या केली. पुरोगामी विचारांच्या पुरस्कर्त्या म्हणून गौरी लंकेश यांची ओळख आहे. प्रस्थापितांना लेखणीतून झोडपण्याचा त्यांचा प्रयत्न आणि आवाज यानिमित्ताने दाबण्यात आला आणि सोशल मिडियावर निषेधाची लाट उसळली. डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यानंतर लंकेश यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याने सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्र्रिया उमटत आहेत. कलाकारांनीही याविरोधात बंड पुकारले असून सोशल मिडियावरुन त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. विवेकाला विवेकाने उत्तर न देता बंदुकीचा वापर करणा-यांचा निषेध नोंदवला जात असून, त्यांचे लेखन थांबले तरी त्यांचे विचार थांबणार नाहीत, हे सत्र आपण किती दिवस सहन करणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी ‘तुम्ही माझ्या पोस्ट्स, लेख वाचता. सात नसेल पण निदान एका गोळीची तरी मी तयारी ठेवायला हवी नं ? मला वाटतं हो, ठेवायला हवी. ब-याच जणांनी तशी तयारी ठेवायला हवी असं दिसतंय...’ अशा शब्दांत लंकेश यांच्या हत्येबाबत फेसबूक अकाऊंटवर मराठी आणि इंग्रजीत तीव्र आक्षेप नोंदवला आहे. स्वत:चे विचार परखडपणे मांडणा-यांचा जीव आता सुरक्षित नाही, त्यांची जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, तरी आपण बोलत रहायला हवे, या विचारांना अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. शेकडो जणांनी ही पोस्ट शेअर केली असून, ८००-९०० जणांनी याबाबत निर्भिडपणे आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
अभिनेता जितेंद्र जोशीने ‘मी एफबी आणि टिवटर बंद केलं होतं. कारण भाषावाद, प्रांतवाद आणि हिंदी/मराठी भाषेविषयी जातीविषयी आपापली टोकाची मतं लोक व्यक्त करताना पाहात होतो. परंतु काल आणखी एक गोळी झाड़ली गेली आणि विचार संपवण्याचा पुन्हा प्रयत्न झाला. मला बोललं पाहिजे. कारण बोलल्याने हत्या होणार असेल आणि न बोलता मुर्दाड जीणं जगायचं असेल तर मला बोलायलाच हवं . निदान काही लोकांनी तरी. सहमत असाल तर हे पोहोचू दया अन्यथा शिव्या शाप आहेतच लोकांकडे’, अशा स्वरुपात भावना व्यक्त करत अतुल कुलकर्णी यांची पोस्टही शेअर केली आहे. जितेंद्रने ‘इतनी आवाजें अनगिनत इच्छाएँ, पल पल का बैर घड़ी घड़ी का बखेड़ा’ ही स्वलिखित कविता फेसबूक अकाऊंटवर शेअर करत समाजातील सद्यस्थितीचे समर्पक वर्णन केले आहे. अभिनेत्री रेणुका शहा यांनीही ‘आणखी एका पुरोगामी आवाजाचा अज्ञातांकडून अंत’ अशा शब्दांत फेसबूकवर संताप व्यक्त केला आहे. गौरी लंकेश यांच्या आत्म्यास शांती लाभो! दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांची हत्या कोणी केली? आपल्याला कधी तरी हे कळणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.