मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरचा आवाज घुमला
By admin | Published: February 10, 2017 12:45 AM2017-02-10T00:45:24+5:302017-02-10T00:45:24+5:30
धनंजय महाडिक : मांडला लोकसभेत प्रश्न; शून्य प्रहरात वेधले लक्ष
कोल्हापूर : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे, असा ठाम मुद्दा खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी लोकसभेत उपस्थित केला. देशाच्या सर्वोच्च सभागृहात मराठा समाजाच्या अस्मितेला आणि जिव्हाळ््याच्या मागणीला वाचा फोडली. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शून्य प्रहरात त्यांनी मराठा आरक्षणाकडे लक्ष वेधले. कोपर्डी येथील तरुणीवर अत्याचार व तिची हत्या झाल्यानंतर मराठा समाजाने संघटित होत शांत व शिस्तबद्धपणे विराट मोर्चे काढल्याचे त्यांनी नमूद केले. मराठा समाजातील बहुतांश लोक अल्पभूधारक शेतकरी आहेत. आरक्षण नसल्याने त्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी मोठी रक्कम मोजावी लागते, तसेच या समाजातील युवावर्गाची शैक्षणिक प्रगती खुंटली आहे. त्यांना शिक्षणाच्या व नोकरीच्या संधी मिळाव्यात यासाठी आरक्षणाची गरज असल्याचे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.