व्हॉट्सअॅप ठरतेय संसारात अडथळा
By Admin | Published: February 16, 2015 03:34 AM2015-02-16T03:34:30+5:302015-02-16T04:19:41+5:30
ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे मागील वर्षभरात समुपदेशनासाठी आलेल्या ५०० अर्जांपैकी ४५ अर्जदार दाम्पत्यांची गाडी रुळांवर आणण्यात आली आहे
ठाणे : ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे मागील वर्षभरात समुपदेशनासाठी आलेल्या ५०० अर्जांपैकी ४५ अर्जदार दाम्पत्यांची गाडी रुळांवर आणण्यात आली आहे. त्या अर्जांत ७० ते ८० टक्के अर्जदारांची पत्नी रात्री उशिरापर्यंत मोबाइल व व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करत असल्याची बाब पुढे आली आहे.
वेगळे राहू पाहणाऱ्या दाम्पत्यांसाठी समुपदेशनाचे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली करते. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१४ दरम्यान ५०० हून अधिक जोडप्यांनी संसार वाचविण्यासाठी या प्राधिकरणाकडे धाव घेतली़ त्यात व्हॉट्सअॅप हे मोठे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच काही जोडप्यांनी तर तीन महिन्यांतच वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. एका प्रकरणात तर लग्नानंतर हनिमूनला जात असतानाच या जोडप्यावर सोडचिठ्ठी घेण्याची वेळ आली. ३०-३५ वर्षे संसार करणारे वृद्ध जोडपे वेगळे राहण्याचे स्वप्न पाहत आहे. त्यांचे मनोमिलन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ५०० अर्जांपैकी ४५ दाम्पत्यांचे संसार मोडण्याआधी पुन्हा सुरळीत करण्यात यश आल्याचे प्राधिकरण सदस्य वकील त्र्यंबक कोचेवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)