माझ्या कणाकणांत स्वयंसेवक!-राम नाईक
By admin | Published: October 23, 2014 04:04 AM2014-10-23T04:04:32+5:302014-10-23T04:04:32+5:30
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक होण्याची किंवा त्याचा राजीनामा देण्याची कोणतीही पद्धत नाही. त्यामुळे आज मी उत्तर प्रदेश राज्याचा राज्यपाल असलो
मुंबई : ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक होण्याची किंवा त्याचा राजीनामा देण्याची कोणतीही पद्धत नाही. त्यामुळे आज मी उत्तर प्रदेश राज्याचा राज्यपाल असलो, तरी मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि माझ्या शरीराच्या कणाकणांत स्वयंसेवक भरलेला आहे’, अशा स्पष्ट शब्दांत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी संघासोबतचे आपले संबंध जाहीर केले. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित वार्तालापामध्ये नाईक बोलत होते.
राम नाईक म्हणाले की, राज्यपाल होताच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा आपण राजीनामा दिला होता. त्यामुळे आता आपण कोणत्याही पक्षाचे सदस्य नसून सर्व पक्षांचे अध्यक्ष माझे मित्र आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत संघाच्या १० वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना राजभवनवर जेवणासाठी आमंत्रित केल्याची कबुलीही त्यांनी या वेळी दिली. शिवाय राजकारणात आणि समाजात एक जातीची आणि दुसरी राजकीय अस्पृश्यता पाळली जात आहे. त्यावर आपला विश्वास नसल्याचे स्पष्टीकरणही नाईक यांनी दिले.
उत्तर प्रदेशात होत असलेल्या आरोपांचे खंडन करताना ते म्हणाले, ‘मी भाजपाचा एजंट नसून केंद्र व राज्य शासनात सेतू म्हणून काम करत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी एखाद्या गोष्टीत मला दखल द्यावी लागत असेल, तर मी दखलबाजी करणारच. कारण लोकांच्या समस्यांकडे गंभीरतेने लक्ष देणे सरकारचे काम आहे.’
राज्यपाल म्हणजे राजकीय निवृत्ती नाही!
राज्यपाल म्हणजे निवडणूक हरलेल्या नेत्यांना राजकारणातून दिलेली निवृत्ती आहे, हा लोकांचा गैरसमज असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘वास्तवात राज्य शासन नियमाच्या चौकटीत राहून
काम करते की नाही, यावर लक्ष ठेवण्याचे काम राज्यपालाचे
आहे. त्यामुळे घटनेप्रमाणे काम होतेय की नाही, हे पाहण्याचे काम गेल्या
तीन महिन्यांपासून मी करत
आहे.’ (प्रतिनिधी)