आव्हाने पेलण्यास स्वयंसेवकांनी सज्ज व्हावे
By admin | Published: October 10, 2016 02:53 PM2016-10-10T14:53:31+5:302016-10-10T14:53:31+5:30
समाज संघटन हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य ध्येय असून केवळ कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच संघाचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे
Next
फोंडा, दि. १० - समाज संघटन हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य ध्येय असून केवळ कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच संघाचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. विद्यमान परिस्थितीत संघाचे कार्य पुढे नेताना संघाच्या स्वयंसेवकांनी कोणतीही आव्हाने पेलण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख प्रा. अनिरुध्द देशपांडे यांनी फोंड्यात केले.
येथील गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या सभागृहात विजया दशमी कार्यक्रमात संघाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर नवनिर्वाचित गोवा विभाग संघ प्रमुख लक्ष्मण बेहरे उपस्थित होते. या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर, पंचायतमंत्री राजेंद्र आर्लेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, पणजीचे आमदार सिध्दार्थ कुंकळयेकर, सुभाष फळदेसाई व सुमारे ६00 कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा. देशपांडे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एखादी संस्था किंवा संप्रदाय नसून ती एक संघटित शक्ती आहे. या शक्तीचे कार्य सर्वदूर परिचित आहे. देशभरातील संघाच्या शाखा या सज्जन शक्तीचे व कार्यकर्ते तयार करण्याचे प्रमुख केंद्र असून आजपर्यंत संघाने समाजाला संघटित करून विचारांची नवी दिशा दाखवून दिल्याचे ते म्हणाले.
गोवा विभाग संघप्रमुख लक्ष्मण बेहरे यांनी कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे सांगून संघ स्वयंसेवकांनी परिस्थितीचा सामना करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. तसेच आजच्या काहीशा कमी उपस्थितीचा संघावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगून संघाचे कार्य पूर्वीच्याच जोमाने पुढे नेले जाईल, असे ते म्हणाले.
तत्पूर्वी या कार्यक्रमाला उपस्थित संघ स्वयंसेवकांनी वरचा बाजार ते तिस्क फोंडा व तेथून आल्मेदा हायस्कूलपर्यंत नवीन गणवेशात पथसंचलन केले. त्यानंतर आल्मेदा हायस्कूलच्या सभागृहात लक्ष्मण बेहरे यांच्या हस्ते शस्त्रपूजा करण्यात आली.
दरम्यान, या कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया देण्यास संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर तसेच विनय तेंडुलकर यांनी नकार दिला.
(प्रतिनिधी)