VIDEO- पेट्रोल पंपावर बंदुकीच्या धाकानं टाकला दरोडा
By admin | Published: January 17, 2017 07:15 AM2017-01-17T07:15:16+5:302017-01-17T07:15:16+5:30
हिरेमठ पेट्रोलपंपावर सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमाराला अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीच्या फैरी झाडीत सिनेस्टाईल दरोडा टाकला.
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 17 - येथील शहरालगत असलेल्या साखरा पाटीजवळील हिरेमठ पेट्रोलपंपावर सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमाराला अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीच्या फैरी झाडीत सिनेस्टाईल दरोडा टाकला. तोंडाला स्कार्फ बांधून विनानंबरच्या दुचाकीवरुन आलेल्या तिघांंनी पंपावरच्या केबिनवर बंदुकीच्या दोन फैरी झाडल्या. पंप चालक श्रीकांत हिरेमठ यांच्या अंगाला गोळी चाटून गेली. जीव वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या हिरेमठांवर दरोडेखोरांनी पुन्हा धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. यात हिरेमठ हे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडताच त्यांच्या अंगावरील सोने आणि पंपाच्या तिजोरीतील रोकड घेऊन दरोडेखोर पसार झाले.
लातूरपासून दहा-बारा किलोमीटरवर असलेल्या साखरा पाटील परिसरातील शहरातील १२ नंबर पाटीजवळ श्रीकांत हिरेमठ यांचा हिरेमठ पेट्रोलपंप आहे. रात्री साडेआठच्या सुमाराला या पंपावर विनानंबरच्या दुचाकीवरून पिस्तुल दाखवून दहशत निर्माण करीत तीन दरोडेखोरांनी प्रवेश केला. तिघांच्याही तोंडाला स्कार्फ बांधलेले होते. तिघांनी वेगवेगळ्या कृती केल्या. एकाने पंपावरील डिझेलवरील कामगाराच्या कनपट्टीला बंदूक लावली. दुसऱ्याने पेट्रोल पंपावरील शस्त्राचा धाक दाखविला तर तिसऱ्याने थेट आपला मोर्चा थेट पेट्रोलपंप चालक हिरेमठ केबिनकडे वळवित दरोडेखोरांनी गोळीबारही केला. तिघांजवळ दोन बंदुकी होत्या. दोघांनीही बंदुकीतून दोन फैऱ्या झाडल्या. एकाच्या बंदुकीतून सुटलेली एक गोळी हिरेमठ यांच्या अंगाला चाटून गेली.
गोळीबार होतोय हे पाहून हिरेमठ यांचा जीव वाचविण्यासाठी धावपळ करीत दरोडेखोरांचा प्रतिकार केला. कामगारांनीही प्रतिकार सुरु केला. त्याचवेळी तिसऱ्या दरोडेखोराने हातातील धारदार शस्त्राने हिरेमठ यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हिरेमठ यांच्या दोन्ही हातावर वार झाले. रक्तबंबाळ झालेले हिरेमठ जखमी पडले असता त्यांच्याकडून भिती दाखवून अंगावरील सोन्याचे लॉकेट व अंगठी काढून घेण्यात आली़ याशिवाय पेट्रोल पंपाच्या तिजोरीतील दिवसभर जमा झालेली रोख रक्कमही घेऊन दरोडेखोर पसार झाले आहेत. ते पळ काढीत असतानाच पंपावरील कामगारांनी त्यांच्यावर दगडफेक केली. मात्र त्यांना रोखण्यास कामगारांना अपयशच आले. रक्कम किती गेली, याबाबत अद्याप ठोस आकडा सांगितला गेला नाही़ मात्र तीनपैकी एकाच काऊंटरवरील बॅगेतील रक्कम मालकाकडे जमा केल्याचे कामगारांनी सांगितले़ यात जवळपास ७५ ते ९० हजाराच्या आसपास रक्कम असावी, असे सांगितले गेले़ काळ्या कपड्यातील स्कार्फ बांधलेले चोरटे होते़
श्रीकांत हिरेमठ यांना जखमी अवस्थेत लोकमान्य अतिदक्षता रुग्णालयात दाखल करण्यात आले. याचे वृत्त समजताच शहरातील सर्व पेट्रेलपंपचालक आणि व्यापाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली होती. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, हे कळल्यानंतरच ही गर्दी मावळली. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत गातेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.
२० फुटांवर सापडला गावठी कट्टा !
आरोपी पळून जात असताना पंपावरील कामगारांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले. मात्र कामगारांनी केलेल्या दगडफेकीत एक दगड एका आरोपीला लागला असावा. या गडबडीत एका आरोपीच्या हातातील गावठी कट्टा २० फुटावर पडलेला सापडला.
दीड वर्षापूर्वी याच पंपावर पडला होता सशस्त्र दरोडा
दीड वर्षांपूर्वी याच हिरेमठ पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडला होता. आता दुसऱ्यांदा हा दरोडा पडला आहे. मागच्या वर्षी पडलेल्या दरोड्यावेळी पंपावरील कामगार जखमी झाले होते. आता खुद्द मालक दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. जवळपास दहा आरोपींवर गुन्हे दाखल झाले होते. यातील अनेकांना अटक करण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण न्याप्रविष्ठ आहे.
पोलिसांनी केली तातडीने नाकाबंदी !
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुरुड पोलिस ठाणे, गातेगाव पोलिस ठाणे आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधीक्षक शिवाजीराव राठोड यांनी तातडीने जिल्हाभरात नाकाबंदीचे आदेश दिले. त्यामुळे शहराच्या सर्व बाजूंनी पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरु केली होती. मात्र पोलिसांना हाती काहीच लागत नव्हते.
जिल्ह्यातील पेट्रोलपंपचालकांमध्ये पसरली दहशत
शहरातील स्वस्तिक पेट्रोल पंपावरील बसवराज ठेसे यांच्यावरील हल्ला आणि त्यांचा खून करुन आठ लाख रुपये लुटल्याचे प्रकरण, गेल्या वर्षी हिरेमठ पेट्रोल पंपावरच दहाजणांनी टाकलेला सशस्त्र दरोडा आणि आता पुन्हा बंदुकीचा धाक दाखवून सोमवारी टाकण्यात आलेला दरोडा. या घटनांमुळे पेट्रोलपंपचालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ठेसे खून आणि लूट प्रकरणातील अन्य आरोपींना शिक्षा झालेली असतानाही मुख्य आरोपी मात्र दोन वर्षांपासून लातूर पोलिसांना गुंगारा देत आहे. पंपचालक टार्गेट होत असल्याने चालकांमधून भिती व्यक्त करण्यात येत आहे.
लातूर पोलिसांची दोन पथके उस्मानाबादला
आरोपी घटनेनंतर उस्मानाबाद जिल्ह्याकडच्या रस्त्याने आपल्या दुचाकीवरून पळून गेल्याचे पंपावरील कामगारांनी पोलिसांना सांगितले़ त्यामुळे लातूर पोलिसांची दोन पथके उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीत रवाना झाली आहेत़ पोलिस निरीक्षक पडवळ, पोनि़ दिपरत्न गायकवाड यांच्या नेतृत्वात ही पथके रवाना झाली आहेत़
दररोज ८ वाजता रक्कम मालकाकडे व्हायची जमा
दररोज संध्याकाळी ८ वाजता या पंपावरील सर्व कामगार आपल्याकडील दिवसभराची रक्कम मालकाकडे जमा करत असत़ सोमवारी महिंद्रा एक्सयुव्ही गाडीने हिरेमठ हे पंपावर रक्कम आणण्यासाठी गेले होते़ बहुदा हे आरोपींना माहित असल्यानेच ८ ची वेळ आरोपींनी गाठली असवी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली़