असहिष्णुतेविरोधात लेखणीतून मते मांडा
By admin | Published: November 7, 2015 02:47 AM2015-11-07T02:47:32+5:302015-11-07T02:47:32+5:30
दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येमुळे समाजाला कलंकच लागला आहे. हत्येचे कुणीही समर्थन करणार नाही. देशातील असहिष्णुतेच्या वातावरणामुळे साहित्यिकांनी पुरस्कार परत
पुणे : दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येमुळे समाजाला कलंकच लागला आहे. हत्येचे कुणीही समर्थन करणार नाही. देशातील असहिष्णुतेच्या वातावरणामुळे साहित्यिकांनी पुरस्कार परत करणे सुरू केले आहे. एखाद्या घटनेसंदर्भात मत कसे मांडावे, याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. असहिष्णुतेबाबत लेखकांनी लेखणीद्वारे मते मांडावीत. तसेच या मुद्द्यावर सरकार आणि साहित्यिकांत संवाद व्हावा, अशी अपेक्षा ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली.
संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सबनीस यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रतिभावंतांच्या हत्येचे कुणीही समर्थन करणार नाही. अशा घटना असंस्कृतपणाचे लक्षण आहे. धर्माच्या उन्मादामुळे असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले आहे. साहित्यिकांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्याद्वारे पुरस्कार परत केले असले, तरी लिखाणाद्वारे कुणी मते मांडलेली नाहीत. अशा घटना देशाला नवीन नाहीत. त्यामुळे त्याचे खापर एखाद्या व्यक्तीवर फोडणे योग्य नाही; पण अशा गोष्टींचा मी निषेधच करतो. समाजातील विद्वान व्यक्ती आणि साहित्यिकांनी एकत्र येऊन संवादाचा पूल बांधल्यास देशाच्या भवितव्याला आकार देता येऊ शकेल. निधर्मी साहित्याची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
शेतकरी मरतोय, दुसरीकडे पाण्याचा- धर्मवादाचा प्रश्न आहे. शेतकरी मरत असताना या मातीच्या सुपुत्राशी कुणी बेईमानी केलेली शोभू शकत नाही. सरकार, साहित्यिक, विचारवंतांची भूमिका या घटकाशी प्रामाणिक आहे का, हे शोधून बेइमानांचा पर्दाफाश करण्याचा संमेलनात प्रयत्न करीन. संमेलन संवादाचे माध्यम असावे; संघर्षाचे नाही.
- श्रीपाल सबनीस, नवनिर्वाचित अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन