विचार करून मतदान करा! बॉलीवूड कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 04:11 PM2019-04-26T16:11:26+5:302019-04-26T16:11:59+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संविधानाला धोका पोहचविणाऱ्या जात-धर्मांध शक्तीना बाजूला सारा आणि लोकशाहीवादी निधर्मी पक्षांना मतदान करा असे आवाहन करण्यात आले.
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संविधानाला धोका पोहचविणाऱ्या जात-धर्मांध शक्तीना बाजूला सारा आणि लोकशाहीवादी निधर्मी पक्षांना मतदान करा असे आवाहन ‘सीटीझन फोरम फॉर डेमोक्रसी या संघटनेच्या माध्यमातून बॉलीवूड कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांनी केले आहे.
समन्वय समितीतर्फे पहिल्या टप्प्यात मुंबईतील सर्व लोकशाही ह्कांसाठी लढणाऱ्या सर्व जाती धर्माच्या मानवी हक्क तसेच सामाजिक संघटनाना एकत्र आणले गेले. तर दुसऱ्या टप्प्यात सीपीआय जनता दल, आम आदमी पार्टी, लोक जनशक्ती अशा सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणून महा गठबंधन पत्रकार परिषद घेतली गेली. तिसऱ्या टप्प्यात हिंदी तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील कलावंत, लेखक दिग्दर्शक, निर्माते संगीतकार याना एकत्र आणले गेले त्या प्रसंगी चित्रपट क्षेत्रातील सईद मिर्झा, अंजुम राजबली यांनी सर्व कलावंतांच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन केले.
२३ एप्रिल रोजी संध्याकाळी मुंबईतील मरीन लाईन्स येथील ‘इस्लामिक जिमखाना’ येथे ही मिटिंग पार पडली त्यावेळी सईद मिर्झा, अंजुम राजबली, उर्मी जुवेकर, विकी आचार्य असे बॉलीवूड इंडस्ट्रीमधले तसेच मुंबई विद्यापीठातील माजी नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगेश बनसोड तसेच मराठी रंगभूमीवरील अनेक नामवंत लोकांनी जनतेला ‘धर्मांध शक्तींना बाजूला सारा आणि संविधानाचे रक्षण करा’ असे आवाहन केले. त्यांच्या सोबतच आयोजक फिरोज मिठीबोरवाला, सलीम अल्वारे, रवी भिलाने डॉ. कुंदा प्रमिलानिळकंठ ज्योती बढेकर शदाब सिद्दीकी यांनी तर सीपीआयचे प्रकाश रेड्डी, पत्रकार जतीन देसाई, भारती शर्मा, आशुतोष शिर्के, मिलिंद रानडे, अशा राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली मतेही मांडली.
या प्रसंगी बॉलीवूड उद्योगातील ७१ चित्रपट कलावंत, लेखक, निर्मात्या कलाकारांनी या प्रक्रियेला पाठींबा दर्शवणारे पत्रक अंजुम राजाबली यांनी वाचून दाखवले ते असे ''आम्ही खाली नमूद केलेले ७१ बॉलीवूड कलावंत, लेखक देशातील नागरिकांना असे आवाहन करीत आहोत की भारताच्या लोकशाही निधर्मी संविधानाच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी मतदानाचा अधिकार बजावावा.
आपल्या देशाची ओळख ही विविधता, अनेकता आणि एकमेकाचा आदर करणारी बहुविध सांस्कृतिक एकता असलेला देश अशी आहे. आणि आपल्या देशाची ही ओळख उच्चतम मानून ती जपण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी अपार कष्ट घेतले होते. स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांनीच आपणा सर्व भारतीयांना एकत्र बांधून ठेवले आहे. या तत्वांचे मार्गदर्शन असल्यानेच आपण सर्व भेदभाव आणि अन्यायाचा मुकाबला करू शकलो संघर्षातून मार्ग काढू शकलो. त्यामुळेच या देशाची महत्ता वाढत राहिली आहे.
पण गेली काही वर्षे या प्रजासत्ताक राष्ट्राच्या घटनेने दिलेल्या या मुलभूत तत्वांच्या पायालाच धक्का दिला जात आहे. ही तत्वे उखडून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. या आघाताला रोखण्यासाठी अनेक विध्यार्थी चळवळी होत आहेत, दलितांच्या, अल्पसंख्याकांच्या चळवळी होत आहेत. शेतकरी, कामगार कष्टकरी गरीब हे देखील या मूल्यांच्या संरक्षणार्थ रस्त्यावर उतरलेत.
त्यामुळेच आपल्याला जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचा अभिमान वाटायला हवा आणि त्यासाठी आपण लोकशाहीच्या रक्षणासाठी काही कृती करण्याची गरज आहे. स्वातंत्र्य समता बंधुता या मुलभूत मूल्यांशी आपली असलेली बांधिलकी व्यक्त करण्यासाठी आपण कृती करण्याची वेळ आंता आली आहे. हो, आपली आपापसात मतभिन्नता आणि संघर्ष आहेतच ते आपण नाकारत नाहीच आहोत पण मुलभूत मुल्यांची आपण कास धरली तरच ते सुटू शकतील असा विश्वास आम्हाला वाटतो.
म्हणूनच आम्ही सर्व भारतीय नागरिकांना आमच्या भावा बहिणींना असे आवाहन करीत आहोत की तुम्हाला खरोखर आपल्या देशाची काळजी, आस्था जिव्हाळा आणि अभिमान असेल तर आपली सर्वोच्च ताकद म्हणजे आपला ‘मताधिकार वापरून देशाच्या मूळ वैविध्यपूर्ण संकल्पनेचेच संरक्षण करा. घाई करू नका थोडं थांबा विचार करा आणि मत द्या.'' असे आवाहन या मंडळींनी केले आहे. हे आवाहन करणाऱ्यांमध्ये शबाना आझमी, विजय कृष्ण आचार्य, शुभा मुद्गल अंजुम राजाबली आनंद पटवर्धन, स्वरा भास्कर, रसिका दुग्गल, सोनाली बोस धर्मकीर्ती सुमंत इशिता मोइत्रा, स्वानंद किरकिरे कौसर मुनीर नचिकेत ज यु पटवर्धन उर्मी जुवेकर आणि अन्य ५५ कलाकार लेखक त्यांच्या सोबतच मराठीतील ३५ लेखक कलावंत तसेच फुले आंबेडकरवादी विचारवंतांचा समावेश आहे.