आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला अटक
By admin | Published: February 21, 2017 06:29 PM2017-02-21T18:29:55+5:302017-02-21T18:29:55+5:30
आक्षेपार्ह छायाचित्र टाकल्याप्रकरणी व्हॉट्सअॅपच्या ग्रुप अॅडमिनविरुद्ध गुन्हा दाखल करून रिसोड पोलिसांनी मंगळवारी त्याला ताब्यात घेतले.
ऑनलाइन लोकमत
रिसोड (वाशिम), दि. 21 - व्हॉट्सअॅप ग्रुपवरील प्रोफाईल छायाचित्र बदलून आक्षेपार्ह छायाचित्र टाकल्याप्रकरणी व्हॉट्सअॅपच्या ग्रुप अॅडमिनविरुद्ध गुन्हा दाखल करून रिसोड पोलिसांनी मंगळवारी त्याला ताब्यात घेतले. ही घटना तालुक्यातील वाकद येथे सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती.
हरिश भारत झिजान यांनी फिर्याद नोंदविली की, शाहरुख खॉ, अलीयार खॉ हा आॅल इन वन या व्हॉटस् अप ग्रुपचा अॅडमिन असून त्याने स्वत: मोराच्या पंखासारखे फुलपाखराचे प्रोफाईल छायाचित्र ठेवले असताना, या छायाचित्रात बदल करून महापुरुषाचे आक्षेपार्ह छायाचित्र बनविले आणि सदर छायाचित्र प्रोफाईल म्हणून अपलोड केले. यामुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या.
सोमवारी रात्री वाकद येथे तणाव निर्माण झाला होता. रिसोड ते वाकद हा मार्ग काही तास बंद ठेवण्यात आला होता. आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी सोमवारी रात्रीच्या सुमारास रिसोड पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. याप्रकरणी सोमवारी रात्रीदरम्यान फिर्याद दाखल झाली. या फिर्यादीवरून शाहरुख खॉ, अलीयार खॉ याच्याविरुद्ध कलम २९४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. रिसोड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी जयकुमार चक्रे, ठाणेदार प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय रत्नपारखी करीत आहेत.