मतदारराजासाठी ‘हटके’ मतदान केंद्र
By admin | Published: February 11, 2017 02:43 AM2017-02-11T02:43:59+5:302017-02-11T02:43:59+5:30
फुलांच्या माळा व फुगे लावून सजविलेले मतदान केंद्र, खेळती हवा, पिण्यासाठी स्वच्छ पाणी अन् रांगेत उभे राहण्यासाठी सावली याचबरोबर
पुणे : रांगोळ््यांचे सडे... फुलांच्या माळा व फुगे लावून सजविलेले मतदान केंद्र, खेळती हवा, पिण्यासाठी स्वच्छ पाणी अन् रांगेत उभे राहण्यासाठी सावली याचबरोबर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नव मतदारांचे फुल देऊन स्वागत करण्यात येणार आहे.. असे असेल जिल्ह्यातील आदर्श मतदान केंद्र.
जास्तीत जास्त लोकांनी मतदान करण्यासाठी घराबाहेर पडावे म्हणून विविध उपाययोजना केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक तालुक्यात किमान दहा मतदान केंद्र या पद्धतीने आदर्श मतदान केंद्र करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी व निवडणूक निरीक्षक रमेश काळे यांनी दिली.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी व आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक, निवडणूक निरीक्षक दीपक नलवडे, प्रकाश कदम, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जिल्हा समन्वय अधिकारी विक्रांत चव्हाण आदी नियंत्रण अधिकारी उपस्थित होते.
उमेदवारांची यादी अंतिम झाल्यानंतर सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांंनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांंसह सर्व उमेदवारांना पत्र देऊन उमेदवारांची बैठक घ्यावी. आकडेवारी व्यवस्थित कळवावी, असे राव यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)