नवीन उमेदवारांना मतदारांची पसंती

By admin | Published: February 27, 2017 12:15 AM2017-02-27T00:15:46+5:302017-02-27T00:15:46+5:30

महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग १७ च्या लढतीमध्ये भाजपाचे पॅनल विजयी झाले

Voters' choice for new candidates | नवीन उमेदवारांना मतदारांची पसंती

नवीन उमेदवारांना मतदारांची पसंती

Next


रावेत : महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग १७ च्या लढतीमध्ये भाजपाचे पॅनल विजयी झाले. नामदेव ढाके, माधुरी कुलकर्णी, करूणा चिंचवडे, सचिन चिंचवडे या नवीन चेहऱ्यांना संधी दिली. नवीन उमेदवारांना मतदारांना या प्रभागातून पसंती दिली. पाच वेळा निवडून आलेले भाऊसाहेब भोईर पराभूत झाले.
चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, बिजलीनगरी, दळवीनगर या अत्यंत चुरशीच्या समजल्या गेलेल्या आणि पूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग १७ मधे राष्ट्रवादीचे मात्तबर विरूद्ध नवीन चेहरे असा सामना होता. मोदीलाटेचा प्रभाव या प्रभाग जाणविला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या दिग्गज उमेदवार विद्यमान नगरसेविका आशा सूर्यवंशी यांचा भाजपाच्या उमेदवार करुणा चिंचवडे यांनी दारुण पराभव केला.
मागील निवडणुकीत विजयाने थोडक्यात हुलकावणी दिलेल्या माधुरी कुलकर्णीला मात्र मतदारांनी या वेळी विजयाची माळ घातली. तसेच मागील निवडणुकीत थोडक्या मतांनी पराभूत झालेले नामदेव ढाके या निवडणुकीत मात्र मताधिक्याने निवडून आले. त्यांनी माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे राजेंद्र साळुंखे यांचा पराभव केला. या निकालावर बिजलीनगर, वाल्हेकरवाडीचे भविष्य ठरणार होते.
नवीन चेहरा करुणा चिंचवडे यांनीही आघाडी घेतली. स्थलांतरित वर्ग व तरुण वर्ग यामुळे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना फायदा झाला. राष्ट्रवादीचे तगडे पॅनल असूनही त्याला भारतीय जनता पार्टीने तोड दिली. या प्रभागासाठी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी जोरदार ताकद लावली होती. नियोजनबद्ध प्रचार आणि मतदारांचा विश्वास संपादन करण्यात भाजपाला यश आले, असे जरी असले तरी मतदान यंत्रात फेरफार केल्याच्या तक्रारी राष्ट्रवादीने केल्या आहेत. वास्तविक कोणत्याही दिग्गज नेत्याची प्रचार सभा झाली नसताना मतदारांनी सर्वच नवीन उमेदवारांना संधी दिली आहे. (वार्ताहर)
>पक्षनिहाय मिळालेली मते
भाजपा : अ गट - नामदेव ढाके (१४०२), ब गट - माधुरी कुलकर्णी (११६७९), क गट - करुणा चिंचवडे (१४११६), ड गट - सचिन चिंचवडे (१२४४५)
राष्ट्रवादी : अ गट - राजेंद्र साळुंखे (८४४९), ब गट - शोभा वाल्हेकर (६५४७), क गट - आशा सूर्यवंशी (८८९२), ड गट - भाऊसाहेब भोईर (१०२८९)
शिवसेना : अ गट- सोंडकर चिंतामणी (३४१०), ब गट- मंगल वाल्हेकर (५५९६), क गट -रजनी वाघ (४५२४), ड गट - बाळासाहेब वाल्हेकर (३७४६)
>चिंचवडमध्ये विद्यमानांना धक्के
चिंचवड : प्रभाग क्रमांक १८ मधील शिवसेनेतून निवडणूक रिंगणात उतरलेले अनंत कोऱ्हाळे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. गत निवडणुकीत मनसेमधून विजयी झालेले कोऱ्हाळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या निवडणुकीत भाजपाचे राजेंद्र गावडे यांनी विजय मिळविला. राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक संदीप चिंचवडे हे पराभूत झाले. भाजपाचे उमेदवार सुरेश भोईर यांनी विजय मिळविला. या निवडणुकीत भाजपाने विजय मिळविला.
प्रभाग क्रमांक १९ मधून राष्ट्रवादीच्या शमीम पठाण यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका जयश्री गावडे यांनी या निवडणुकीत भाजपातून उमेदवारी मिळविली होती. त्या चांगल्या मतांनी विजयी झाल्या. याच प्रभागातून राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक गुरुबक्ष पहेलानी निवडणूक रिंगणात होते. भाजपाचे विद्यमान नगरसेवक शीतल ऊर्फ विजय शिंदे यांनी त्यांचा पराभव करून विजय मिळविला.राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक काळुराम पवार यांचा पराभव झाला. भाजपाचे शैलेश मोरे यांनी विजय मिळविला. प्रभाग क्रमांक १७ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार भाऊसाहेब भोईर यांचा पराभव झाला. भाजपाचे सचिन चिंचवडे हे विजयी झाले. राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका आशा सूर्यवंशी यांनाही पराभवाचा धक्का बसला.

Web Title: Voters' choice for new candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.