‘मतदारांनी सारं काही झुगारून लोकशाही निवडली, Narayan Raneयांचं अभिनंदन करत Devendra Fadanvis यांचा Mahavikas Aghadiला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 02:36 PM2021-12-31T14:36:18+5:302021-12-31T14:36:28+5:30
Sindhudurg District bank election result: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपाच्या पॅनेलला यश मिळाल्याने भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निकालाबाबत विरोधी पक्षनेते Devendra Fadanvis यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
मुंबई - सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपाच्या पॅनेलला यश मिळाल्याने भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपाच्या राज्य पातळीवरील मुख्य नेत्यांकडून नारायण राणे यांचं या विजयासाठी अभिनंदन करण्यात येत आहे. आता या निकालाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंचं अभिनंदन करताना महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी, हे सारे काही झुगारून मतदारांनी लोकशाही निवडली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, रवींद्र चव्हाण तसेच सर्व भाजपा नेते, कार्यकर्ते आणि विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन, असे देवेंद्र फडणवीस यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या विजयासाठी नारायण राणेंचे अभिनंदन करत महाविकास आघाडीला टोला लगावला होता. ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील विजयासाठी मी नारायण राणे, राजन तेली, नितेश राणे या सर्वांचं अभिनंदन करतो. सहकारामध्ये भाजपा काहीसा मागे होता. मात्र गेल्या काही काळात ही कसर भरून निघत आहे. सिंधुदुर्गात मिळालेलं यश हे फार मोठं यश आहे. शिवसेनेला कोकणाच्या जोरावर महाराष्ट्रात राजकारण करण्याची सवय आहे. मात्र कोकणातला बेस आता सुटू लागल्याने ते हमरीतुमरीवर आले आहेत. तीन चाकी रिक्षा ही महाविकास आघाडीच्या पॅनेलची या निवडणुकीतील निशाणी होती. मात्र ही तीन चाकी रिक्षा या निवडणुकीत पंक्चर झाली, हे या निवडणुकीत दिसून आलं. आता सगळीकडेच ही तीन चाकी रिक्षा पंक्चर होणार आहे, असे भाकितही चंद्रकांत पाटील यांनी केलं.
सरकारी यंत्रणेचा गैरवापर,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 31, 2021
पोलिसी दडपशाही,
सत्तेची अरेरावी,
मतदारांनी सारे काही झुगारून लोकशाही निवडली.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय!
केंद्रीय मंत्री नारायणराव राणे,रवींद्र चव्हाण,सर्व भाजपा नेते,कार्यकर्ते,विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन!@MeNarayanRanehttps://t.co/KgG7hB90Da
दरम्यान, वादविवाद, मारहाण प्रकरण आणि कोर्टकचेरी यामुळे गाजलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत नारायण राणेंच्या नेतृत्वाखालील भाजपाने शिवसेनेला धोबीपछाड दिला आहे. १९ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलला ११ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या खात्यात ८ जागा गेल्या आहेत.