यादीतील घोळामुळे उमेदवारांसह मतदारही गोंधळात
By admin | Published: January 30, 2017 07:56 PM2017-01-30T19:56:13+5:302017-01-30T19:56:52+5:30
प्रभाग फेररचनेमुळे केवळ विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारच नव्हे तर मतदारांच्या गोंधळातही भर घातली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - प्रभाग फेररचनेमुळे केवळ विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारच नव्हे तर मतदारांच्या गोंधळातही भर घातली आहे. शहरातील लोकसंख्या उपनगरात स्थलांतरीत झाल्यामुळे त्यानुसार प्रभागांच्या सीमा रेषा बदलण्यात आल्या आहेत. यामुळे मतदार याद्यांमध्येही मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. याचा परिणाम मतदानावरही होणार असल्याने उमेदवार अस्वस्थ आहेत. काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून ही निवडणूकच रद्द करण्याची मागणी केली आहे. प्रत्येक प्रभागात ५० ते ६० हजार लोकसंख्या ठेवण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. परंतु वरळी येथील प्रभाग क्र. १९४ मध्ये लोकसंख्या आणि मतदारांच्या आकडेवारीत गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. ५८ हजार लोकसंख्या असलेल्या या प्रभागात ६१ हजार ८२५ मतदार नोंदविण्यात आले आहेत. हा घोळ प्रत्यक्ष महापालिकेच्या संकेतस्थळावरच दिसून येत असल्याची तक्रार म्हात्रे यांनी केली आहे. तसेच दहिसर येथील प्रभाग क्र. १ मध्ये लोकसंख्या ४९ हजार ९४० तर मतदार अवघे २४ हजार ७९३ नोंदविण्यात आले आहेत, असा गोंधळ अन्य प्रभागांमध्येही उडाला असण्याची शक्यता आहे. याचा परिणाम संपूर्ण मतदान प्रक्रियेवर होऊ शकतो. त्यामुळे ही निवडणूकच रद्द करण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले.
असे आहेत काही घोळ
मतदाराचे नाव एका प्रभागात आणि मतदानाचा अधिकार दुसऱ्या प्रभागात अशा तक्रारी प्रामुख्याने पुढे आल्या आहेत. यामुळे मतदारांना मतदान करण्यासाठी आधी आपले नाव कुठल्या मतदार यादीत आहे याचा शोध घ्यावा लागेल.
- प्रभाग क्रमांक १९२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर को.आॅप. सो. 1 ते 4, बोहरी चाळ, केसरी चाळ, दूधवाला चाळ क्र. 1 व 2, खापरी देव झोपडपट्टी संघ, दळवी नगर दादर स्थानक हे ठिकाणी मतदार यादीचा गोंधळ आहे.
- शीतल म्हात्रे यांचा भाऊ हार्दिक म्हात्रे हा कॅनेडियन नागरिक आहे. मतदान ओळखपत्र मिळण्यासाठी त्यांनी अर्ज केला नव्हता. त्यांच्या नावाने ओळखपत्र देण्यात आले आहे. घरच्या पत्त्यावर हे ओळखपत्र पाठविण्यात आले असून त्यात आडनावाचाही घोळ आहे. त्यांचे नाव म्हात्रेऐवजी मेहता असे यादीत आले आहे.
- निवडणुकीत 50 टक्क्यांहून कमी मतदान होते. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी निवडणूक आयोगाने जनजागृती सुरू केली आहे. यासाठी मतदान केंद्र प्रत्येक एक किमीच्या अंतरावर असणार आहे. मात्र मतदार यादीतील गोंधळामुळे मतदारांची गैरसोय होऊन त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो.
- 4 फेब्रुवारीपर्यंत मतदार यादीतील चूक सुधारता येईल. अंतिम मतदार यादी 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे.