वंचितच्या मतदारांनी, कार्यकर्त्यांनी मला स्वीकारलं नाही; वसंत मोरेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 11:33 AM2024-07-05T11:33:14+5:302024-07-05T11:34:45+5:30
वंचितची जबाबदारी ज्या खांद्यावर दिली त्यांनी पुण्यात संघटनावाढीसाठी प्रयत्न केले नाहीत असा आरोप वसंत मोरे यांनी केला.
पुणे - लोकसभा निवडणुकीत पहिल्यापासून मी अपक्ष का होईना निवडणूक लढवणार असं ठरवलं होतं. त्यात माझी प्रकाश आंबेडकरांशी भेट झाली. त्यावेळी मला संघटनेची सोबत असणे गरजेचे होते. वंचित बहुजन आघाडी म्हणून पुणे शहरात चांगले काम करता येईल अशी संधी आहे वाटत होते. परंतु वंचितमध्ये जे मला यश मिळायला पाहिजे होतं तसं मिळालं नाही. वंचितच्या मतदार, कार्यकर्त्यांनी मला स्वीकारलं नाही असा आरोप वसंत मोरे यांनी केला.
वसंत मोरे हे येत्या ९ जुलैला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात उद्धव सेनेत प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेतला त्यात अशा काही गोष्टी पुढे आल्या, मराठा उमेदवार म्हणून माझ्याकडे पाहण्यात आलं. तर मराठा मतदारांनीही वंचितचा उमेदवार म्हणून मला स्वीकारलं नाही. माझ्या पाठिमागे जे लोक आहेत त्यांचा विचार करावा लागतो. त्यामुळे मी ९ जुलैला मातोश्रीवर जात पक्षप्रवेश करणार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच वंचितच्या काही ठराविक कार्यकर्त्यांनी माझे काम केले. सरसकट सगळ्यांना म्हणणार नाही. प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेडकर यांनी मला वेळ दिला. मतदारांची विभागवार पाहणी केली, वंचितचा मतदार आहे त्याठिकाणी मतदान झाले नाही. त्याठिकाणी लोकांनी काँग्रेसला स्वीकारलं. येणारी महापालिका, विधानसभा पाहता कार्यकर्त्यांचा कल घेतला. या भागात शिवसेनेचा मी सुरुवातीपासूनचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी मी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करणार आहे असं वसंत मोरे यांनी म्हटलं.
दरम्यान, माझ्यासोबत जे खरे वंचितचे कार्यकर्ते आहेत त्यांना माझ्याविरोधात बोलणारे कार्यकर्ते कुठे होते हे माहिती आहे. बाळासाहेबांना अपेक्षित असणारा पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी ताकद वापरावी. उगाच काहीतरी करायचे त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअपवर पोस्ट करायची त्यातून पोलिसांवरचा ताण वाढतो. मी बाळासाहेब आंबेडकरांना स्वत: मेसेज केला. २०१८ ला वंचितची स्थापना झाली, ज्यांच्या खांद्यावर पुण्याची जबाबदारी दिली. त्यांनी संघटना वाढीसाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. ही खदखद वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. संघटनावाढीसाठी फेरबदल करावा असं मी प्रकाश आंबेडकरांना म्हटलं होते असंही वसंत मोरे यांनी सांगितले.
पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन
मी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडून शिवसेनेत प्रवेश करत नाही. मला पक्ष जी जबाबदारी देईल ती मी योग्यरित्या पार पाडेन. पुणे शहरात माझ्या पक्षप्रवेशानंतर पदाधिकाऱ्यांचा मेळावा होईल अशी माहितीही वसंत मोरे यांनी दिली.