मतदार ‘जन्नत’ पाहून आले जमिनीवर...
By admin | Published: December 28, 2015 01:02 AM2015-12-28T01:02:55+5:302015-12-28T01:06:05+5:30
विधान परिषद सहल : उमेदवारांकडून आई-वडिलांनी केली नसेल इतकी सेवा...
कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीनिमित्त दोन्ही उमेदवारांनी आपले मतदार चार-पाच दिवस सहलीवर पाठविले होते. तेथे त्यांचे पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणे, विमान प्रवास, मनाप्रमाणे शॉपिंग, फिरण्यासाठी आलिशान चारचाकी गाडी, तसेच सायंकाळी मालिशसाठी स्वतंत्र व्यवस्था, आदी शाही बडदास्त ठेवली होती. त्यामुळे मतदार भलतेच खूश झाले होते. रविवारी हे सर्व मतदार ‘शाही’ सहलीवरून कोल्हापुरात मतदान केंद्रावर परतले. त्यानंतर, आमच्या बालपणी आई-वडिलांनीही सेवा केली नसेल इतकी सेवा या उमेदवार व समर्थकांनी केल्याची भावना एका नगरसेवक मतदाराने यावेळी व्यक्त केली. याच प्रकारचा सूर सहलीवरून परतलेल्या बहुतांश नगरसेवकांचा होता. काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांनी सहलीस पाठविलेल्या महानगरपालिकेतील नगरसेवकांसह जिल्हा परिषदेचे सदस्य, तसेच नगरपालिकेतील काही सदस्य राज्याबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी विमान प्रवास करीत हिल स्टेशन पार करीत होते. हीच परिस्थिती बंडखोर उमेदवार महादेवराव महाडिक यांच्याही बाबतीत होती. त्यांनीही आपल्या गटाच्या मतदारांना विमानाने सहलीवर पाठविले होते. विशेष म्हणजे दोन्हीही गटांकडून सदस्यांना सहकुटुंब सहलीवर नेले होते. गेल्या दहा दिवसांपासून या मतदारांची वेगवेगळ्या गटांकडून शाही बडदास्त राखली जात होती. पंचतारांकित हॉटेलमध्ये मागेल ते खाण्यासाठी मिळत होते; तर त्यांना ज्या हिल स्टेशनवर नेले जात होते, तेथेही खरेदी करण्यासाठी आलिशान कार उपलब्ध करून दिली जात होती; पण ते मतदार व त्यांच्या कुटुंबीयांवर नजर ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत दोन बॉडीगार्डही दिले जात होते. अक्षरश: महिला मतदारांना नवीन पर्स घेण्यासाठीही पैसे देण्यात आले. मतदारांनी कपडे, साड्यांचीही खरेदी केली; पण त्यांचे पैसे भागविण्याची वेळही उमेदवारांवरच आली.
दहा नगरसेवकांची प्रकृती बिघडली
सहलीदरम्यान मतदारांवर दिवसभर ओल्या पार्टीची खैरात होत होती. उठल्यापासून झोपेपर्यंत जे मागेल ते मिळत होते. फुकटचे मिळते म्हणून दिवसभर ‘खाण्या-पिण्यावर’च ताव मारीत होते. परिणामी, एका गटाच्या सहलीतील दहा मतदारांची प्रकृती पूर्णत: खालावली. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागल्याचे समजते. त्याचा खर्च उमेदवारांनी भागविला असला तरी अद्याप या मतदारांची प्रकृती पूर्ण बरी झालेली नाही; पण आता मतदान झाल्याने उपचारांचा खर्च स्वत: करावा लागणार आहे.
‘१०:१५:२०’ चा फॉर्म्युला!
निवडणुकीत नेमके मतदारांना किती पैसे पदरात पडले, याविषयी कमालीची उत्सुकता आहे. काही नगरसेवकांना प्रत्येकी १० लाख, काहींना १५ लाख, तर संदिग्धता असलेल्या इचलकरंजी व शिरोळमधील मतदारांना २० लाख रुपये दिल्याचे समजते.