भिवंडी, पनवेल, मालेगावमध्ये आज मतदान
By admin | Published: May 24, 2017 02:28 AM2017-05-24T02:28:28+5:302017-05-24T02:28:28+5:30
मुंबईच्या वेशीवरील पनवेल व भिवंडी महानगरपालिकेसाठी बुधवार, २४ मे रोजी मतदान होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी/पनवेल : मुंबईच्या वेशीवरील पनवेल व भिवंडी महानगरपालिकेसाठी बुधवार, २४ मे रोजी मतदान होत आहे. पनवेल महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असून, रायगड जिल्ह्यातील पहिलीच महापालिका म्हणून या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तर भिवंडीत मतदानाच्या बंदोबस्तासाठी जवळपास अडीच हजार पोलीस तैनात करण्यात आले असून, साडेचार हजार कर्मचारी प्रत्यक्ष मतदानाची व्यवस्था पाहणार आहेत. बंदोबस्तासाठी ड्रोनचा होणारा वापर हाही या वेळी चर्चेचा विषय आहे.
पनवेलमधील एकूण २० प्रभागांतील ७८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. महापालिका क्षेत्रात ४ लाख २५ हजार मतदार असून, निवडणुकीसाठी ४१८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपा-आरपीआय युती, शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी, शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना युती व अपक्ष अशी चौरंगी लढत या निवडणुकीत पाहावयास मिळणार आहे. महापालिका क्षेत्रातील ५७० केंद्रांवर अडीच हजारांवर पोलीस बंदोबस्त आहे. तर चार हजारांहून अधिक निवडणूक कर्मचारी तैनात आहेत. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या वतीने विविध उपाय राबविण्यात आले असून, मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी यंदा प्रथमच सेल्फी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागात पाच याप्रमाणे एकूण १०० विजेत्यांना २५ टक्के करसवलत देण्यात येणार आहे.
भिवंडीच्या २३ प्रभागांतील ९० जागांसाठी होत असलेल्या मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना प्रचारात उतरवून प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत भाजपाने कोणार्क आघाडीशी समझोता केला आहे. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे; पण काँग्रेस, शिवसेना, भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंट, मनसे, एमआयएम, रिपब्लिकन पक्षांचे विविध गट यामुळे निवडणूक बहुरंगी ठरली आहे. भिवंडीत चार लाख ७९ हजार २५३ मतदार आहेत. त्यात दोन लाख ९१ हजार ९९१ पुरुष आणि एक लाख ८७ हजार २६० महिला आहेत. तृतीयपंथी मतदार दोन आहेत. ६३७ बुथ तयार करण्यात आले आहेत.
शुक्रवारी मतमोजणी
भिवंडी- निजामपूर, मालेगाव व पनवेल महानगरपालिका, धारणी पंचायत समिती, नागभीड नगर परिषद आणि नेवासा, रेणापूर व शिराळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध ७ नगर परिषदांतील ११ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी बुधवारी मतदान होत आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. सर्व ठिकाणी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत मतदान होईल. २६ मे रोजी मतमोजणी होईल. तिन्ही महापालिकेच्या एकूण २५२ जागांसाठी १ हजार २५१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण १२ लाख ९६ हजार ०२६ मतदारांसाठी १ हजार ७३० मतदान केंद्रांची व्यवस्था आहे. आवश्यक तेवढी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे देण्यात आली आहेत. त्यात
२ हजार २९१ कंट्रोल युनिट; तर ७ हजार १४३ बॅलेट युनिटचा समावेश आहे.