राज्य बँकेसाठी २८ जूनला मतदान

By Admin | Published: April 16, 2015 10:56 PM2015-04-16T22:56:14+5:302015-04-17T00:21:54+5:30

आनंद जोगदंड : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उमेदवारी अर्ज

Voting on June 28 for State Bank | राज्य बँकेसाठी २८ जूनला मतदान

राज्य बँकेसाठी २८ जूनला मतदान

googlenewsNext

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेसाठी प्राथमिक मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू झाले असून, २८ जूनला मतदान घेण्याचा विचार असल्याची माहिती राज्य सहकारी प्राधिकरणाचे सचिव डॉ. आनंद जोगदंड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. २१ जागांसाठी मेच्या शेवटच्या आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील सहकारी संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आढावा घेण्यासाठी डॉ. जोगदंड कोल्हापुरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. जोगदंड म्हणाले, डिसेंबर २०१४ अखेर राज्यातील ४० हजार विविध प्रकारच्या सहकारी संस्था निवडणुकीस पात्र होत्या. त्यातील बहुतांशी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
राज्यातील १८ जिल्हा बँकांच्या निवडणुका एकाचवेळी घेतल्या जात आहेत. त्यांचे मतदान ३ मे ला होत असून त्यानंतर राज्य सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रियेला गती येणार आहे. सध्या राज्य बॅँकेची प्रारूप मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा बँकांच्या निवडणुकीनंतर अंतिम यादी तयार केली आहे. प्रत्येक महसूल विभागातून दोन याप्रमाणे सहा विभागांतून १२ संचालक, नागरी बँका, पतसंस्था गटातून तीन विभागातून १ असे दोन संचालक, राखीव पाच व इतर संस्था गटातून दोन असे २१ जणांचे संचालक असणार आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून २८ जूनला मतदान होईल, असे डॉ. जोगदंड यांनी सांगितले.
दरम्यान, कोल्हापूर व सांगली जिल्ह्णांतील संस्था निवडणुकीचा आढावा घेतला, निवडणुकीसंदर्भात काही किरकोळ तक्रारी आल्या होत्या, त्यावर चर्चा झाल्याचेही डॉ. जोगदंड यांनी सांगितले. यावेळी विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे, जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूकर यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांतील उपनिबंधक उपस्थित होते.

उर्वरित संस्थांच्या निवडणुका महिनाभरात!
राज्यातील ७४ सहकारी साखर कारखाने निवडणुकीस पात्र होते, त्यापैकी ५४ साखर कारखान्यांची तसेच ५२ सहकारी सूतगिरणींच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित संस्थांच्या निवडणुका येत्या महिनाभरात पूर्ण होतील. ३० जूनअखेर डिसेंबर अखेरच्या पात्र संस्थांच्या निवडणुका पूर्ण कराव्या लागणार असल्याने प्राधिकरणाने त्याप्रमाणे नियोजन केले आहे, असे डॉ. जोगदंड म्हणाले.

Web Title: Voting on June 28 for State Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.