मतदान यंत्रे दोषपूर्ण, तपासणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 04:43 AM2018-05-27T04:43:32+5:302018-05-27T04:43:32+5:30
राज्यात मतदान यंत्रे (ईव्हीएम मशीन्स) असताना भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी गुजरातहून ती का मागविण्यात आली, याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली होती.
भंडारा - राज्यात मतदान यंत्रे (ईव्हीएम मशीन्स) असताना भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी गुजरातहून ती का मागविण्यात आली, याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली होती.
आता निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार आपण स्वत: कार्यकर्त्यांसोबत काही यंत्रांची तपासणी केली असता ती दोषपूर्ण दिसून आली. त्यामुळे संपूर्ण मतदार यंत्रांचीच तपासणी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत केली.
पटोले म्हणाले, मतदानापूर्वी राजकीय पक्षांकडून आणि उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची तपासणी करण्याचा निवडणूक आयोगाचा नियम आहे. त्यानुसार शुक्रवारला तपासणी करण्यात आली.
त्याअंतर्गत एका यंत्रावर त्यांनी २८ वेळा बटन दाबले असता २९ वेळा मतदान झाल्याचे दिसून आले. त्यानंतर व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठया मोजण्यात आल्या असता ४८ चिठ्ठया निघाल्या. याकडे लक्ष वेधले असता निवडणूक विभागाच्या अभियंत्यांनी यंत्र दुरूस्त केले. त्यानंतर चिन्हासमोरील बटन दाबले असता ते हॅक झाल्याचे सांगितले.
याची तक्रार निवडणूक निरीक्षकांकडे केली असून सर्वच यंत्रांची तपासणी झाली नाही तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले.