मतदानाचा टक्का वाढला; दक्षिण मुंबई, ठाण्यात किंचित घट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 03:00 AM2019-04-30T03:00:42+5:302019-04-30T06:24:04+5:30

देशभरातील चौथ्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदानात सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील मतदानाने मागील वेळेपेक्षा समाधानकारक कामगिरी करत टक्का वाढवला.

Voting percentage increased; South Mumbai, Thin falls slightly | मतदानाचा टक्का वाढला; दक्षिण मुंबई, ठाण्यात किंचित घट

मतदानाचा टक्का वाढला; दक्षिण मुंबई, ठाण्यात किंचित घट

Next

मुंबई : देशभरातील चौथ्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदानात सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील मतदानाने मागील वेळेपेक्षा समाधानकारक कामगिरी करत टक्का वाढवला. प्राथमिक आकडेवारीनुसार दक्षिण मुंबई आणि ठाणे मतदारसंघांत किंचित घट दिसत असली; तरी ती अंतिम आकडेवारीत भरून निघेल, असा अंदाज निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. असह्य उष्मा आणि सलग सुट्या असूनही सोशल मीडिया, विविध प्रसारमाध्यमे, स्वयंसेवी संस्था, निवडणूक आयोगाने केलेल्या जनजागृतीला प्रतिसाद देत मुंबईकरांनी उत्साहात मतदान केले.

मतदार यादीत नाव नसणे, बुथ किंवा केंद्र चुकीचे असण्याच्या तक्रारी या वेळीही होत्या. तसेच ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या आणि त्यामुळे मतदान खोळंबल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या. परंतु त्याचा मतदानावर फारसा परिणाम झाला नाही. मागील म्हणजे २०१४ च्या निवडणुकीत लाट असल्याचा मुद्दा मांडून त्यामुळे मतदानाचा टक्का वाढल्याचे अंदाज व्यक्त केले जात होते. यंदा मात्र तशी कोणतीही थेट लाट नसतानाही मतदानाच्या आकडेवारीत वाढ झाल्याचे दिसून आले.

चौथ्या टप्प्यातील या मतदानातून मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा, भाजपच्या नेत्या पूनम महाजन, अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ, शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, गजानन कीर्र्तिकर यांच्यासह ३२३ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. मुंबईच्या शहर जिल्ह्यातील दक्षिण मुंबईतील मतदानात किंचित घट दिसते आहे; तर दक्षिण मध्य मुंबईत साधारण दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. उपनगर जिल्ह्यातील प्राथमिक आकडेवारीनुसार, उत्तर मुंबईतील मतदारांनी मागील वेळेपेक्षा साधारण आठ टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदवली आहे.

उत्तर पश्चिम आणि उत्तर पूर्व मुंबईत प्रत्येकी सरासरी चार टक्के; तर उत्तर मध्य मुंबईत साधारण तीन टक्के वाढ दिसते आहे.
सुरुवातीच्या आकडेवारीनुसार ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदानात माफक घट दिसत असली, तरी भिवंडीत साधारण दोन टक्के, कल्याण आणि पालघरमध्ये सरासरी एक टक्का वाढ दिसते आहे. पालघर मतदारसंघात मतदानापूर्वीच्या रात्री शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीच्या नेते-कार्यकर्त्यांत झालेला राडा वगळता मुंबई-ठाण्यातील मतदान शांततेत पार पडले. ईव्हीएमबाबतही गंभीर आरोपांची नोंद नाही.

ज्येष्ठांत उत्साह
मुंबईतील १० हजार ७३ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात ज्येष्ठ नागरिकांनी भरभरून मतदान केल्याचे चित्र मुंबईभर पाहायला मिळाले. मतदानकेंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे एकीकडे सर्वसाधारण वयोगटातील मतदार रांगेत आपला नंबर येण्याची वाट पाहत असताना, ज्येष्ठ नागरिक मात्र मतदान करून उत्साहात बाहेर पडत असल्याचे दृश्य ठिकठिकाणी पाहायला मिळाले. काठी, वॉकर, व्हिलचेअरवर कुटुंबीय आणि सोबत्यांच्या आधाराने ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी येत असल्याचे चित्र दिसत होते. वयाची सत्तरी, ऐंशीच नव्हे, तर शंभरी ओलांडलेले मतदारही मोठ्या बाहेर पडले होते. प्रशासनाकडूनही ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्या होत्या.

चित्रपट, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज सकाळीच मतदानासाठी रांगेत उभे राहिल्याचे पाहून इतरांनीही मतदान केंद्राकडे धाव घेतली. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री रेखा, प्रियंका चोप्रा, कंगणा राणावत, महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी रांगेत उभे राहून मतदान केले.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार, अन्य राजकीय नेत्यांनी सहकुटुंब मतदान केले. एरव्ही, मतदानाकडे पाठ फिरविल्याबद्दल सेलिब्रिटी टीकेची धनी होतात. यंदा मात्र, अमिताभ बच्चन यांचे कुटुंबीय, रेखा, आमिर, शाहरूख, सलमान खानपासून अनेक सेलिब्रिटींनी आवर्जून मतदान केले, तसेच नागरिकांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. साधारण ११ नंतर सेलिब्रिटींचे मतदान झाले. विविध वाहिन्या, संकेतस्थळांवर मतदानाबाबतचे त्यांचे आवाहन दाखविण्यात येत होते. मात्र, सकाळच्या सत्रातील मतदारांचा जोर दुसºया सत्रात जाणवला नाही. त्यामुळे सेलिब्रिटींच्या आवाहनाला मुंबईकरांनी थंडा प्रतिसाद दिल्याचे दिसत होते. संध्याकाळी उन्हे उतरल्यावर आणि मतदानाच्या शेवटच्या तासा-दीड तासात मतदानाचा टक्का पुन्हा वाढला आणि त्याने दुपारच्या निरूत्साहावर मात केली. 

ठाणे जिल्ह्यातील प्रक्रिया शांततेत
ठाणे : ठाण्यासह कल्याण, भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या काही किरकोळ घटना वगळता मतदानप्रक्रिया शांततेत झाली. जिल्ह्यातील ६२ लाख २५ हजार १९४ मतदारांपैकी अंदाजे ३० लाख २३ हजार ३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक मतदान भिवंडी मतदारसंघात ५३.६८ टक्के, तर त्याखालोखाल ठाणे मतदारसंघात ५०.२२ टक्के आणि कल्याणमध्ये सर्वात कमी म्हणजे ४४.२७ टक्के मतदान झाले.

ठाण्यात ५०.२२ टक्के मतदान
ठाणे लोकसभा मतदारसंघातील २३ लाख मतदारांपैकी संध्याकाळपर्यंत ११ लाख ९० हजार ३५२ मतदारांनी (५०.२२ टक्के) मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदारसंघातील मतदानकेंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लुईसवाडी, बाजारपेठेतील कन्याशाळा, सावरकरनगर, वर्तकनगर आदी ठिकाणी ईव्हीएम मशीन काही काळ तुरळक बंद पडले. कन्या शाळेत एका ज्येष्ठ महिला मतदाराने एकाच वेळी तीन बटण दाबल्यामुळे सकाळी ११.१५ वाजेच्या दरम्यान १० मिनिटे मशीन बंद पडले होते. या घटनेनंतर मात्र काही वेळेतच पर्यायी मशीनची उपलब्धता होऊन मतदान झाले.
ठाणे मतदारसंघातील मीरा-भार्इंदर विधानसभेत ४८.२१ टक्के, ओवळा-माजिवडा ४८.३२ टक्के, कोपरी-पाचपाखाडीला ४८.५७ टक्के, ठाणे विधानसभेत ४८.६२ टक्के, ऐरोलीत ४८.७९ टक्के आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात ४८.९१ टक्के मतदान शेवटपर्यंत झाले. या सहा विधानसभा मिळून ठाणे लोकसभा मतदारसंघातील २३ लाख ७० हजार २७६ मतदारांपैकी सरासरी अंदाजे ११ लाख ९० हजार ३५३ मतदारांनी (५०.२२ टक्के) मतदानाचा हक्क बजावला.

भिवंडीत सर्वाधिक मतदान
जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांपैकी भिवंडीत सकाळपासूनच सरासरी मतदानाचा टक्का वाढता दिसला. भिवंडी मतदारसंघातील १८ लाख ८९ हजार ७८८ मतदारांपैकी सकाळी ९ वाजेपर्यंत ५.९२ टक्के मतदारांनी मतदान केले. यानंतर, ११ वाजेपर्यंत १५.५ टक्के आणि १ वाजेपर्यंत २२ टक्के, तर दुपारपर्यंत ३९.४२ टक्के मतदान भिवंडीत झाले. यानंतर, ५ वाजेपर्यंत ४७.७२ टक्के आणि संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी अंदाजे ५२ टक्के म्हणजे नऊ लाख ९० हजार ८१५ मतदान झाले आहे. या मतदारसंघातही दुपारपर्यंत १५ ईव्हीएम मशीन बंद पडल्या, तर १७ कंट्रोल युनिट आणि ३३ व्हीव्हीपॅट बंद पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे बहुतांश मतदार नाराज झाले. मात्र, जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघांच्या तुलनेत या मतदारसंघात सर्वाधिक अंदाजे ५३.६८ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. यापैकी भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ६२.१ टक्के, शहापूर विधानसभा मतदारसंघात ५५ टक्के, भिवंडी (प.) विधानसभा मतदारसंघात ४९ टक्के, भिवंडी (पू.) विधानसभा मतदारसंघात ४९ टक्के आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात ४४ टक्के, तर भिवंडी विधानसभा मतदारसंघात ५८ टक्के मतदान झाले.

कल्याणमध्ये अखेरीस उत्साह
कल्याण लोकसभा मतदारसंघातील १९ लाख ६५ हजार १३० मतदारांपैकी संध्याकाळपर्यंत आठ लाख ४१ हजार ८६१ म्हणजे अंदाजे ४४.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात कळवा, मुंब्रा, दिवा परिसरांत ईव्हीएम सकाळी ११ वाजेदरम्यान बहुतांश ठिकाणी बंद असल्याचे आढळून आले. अंबरनाथ, उल्हासनगर आदी परिसरात सुमारे ३८ ठिकाणी ईव्हीएम मशीन सकाळी ८.३० ते ११.३० वाजेदरम्यान बंद पडल्याच्या घटना घडल्या. कल्याण लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात ४४ टक्के, उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात ४२.५ टक्के, कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात ४१ टक्के, डोंबिवली विधानसभा मतदारसंघात ४३.२ टक्के, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ४६.५ टक्के आणि मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील ३९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

नवी मुंबईत टक्का कमीच
नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये नवी मुंबईमधील ऐरोली व बेलापूर विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार ठाणे शहरामधील असल्यामुळे नवी मुंबईमध्ये प्रचाराप्रमाणे मतदानामध्येही उत्साह दिसला नाही. उन्हाळी सुट्ट्या, यात्रा, लग्न व गावाकडील निवडणूक यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकणसह इतर

Web Title: Voting percentage increased; South Mumbai, Thin falls slightly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.