सर्वांचा मतदानाचा हक्क अबाधित राहील
By admin | Published: May 9, 2014 01:37 AM2014-05-09T01:37:13+5:302014-05-09T01:37:13+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीत कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल व यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल व यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन गुरुवारी राज्य शासनाने उच्च न्यायालयाला दिले़ अॅडव्होकेट जनरल डी़ जे़ खंबाटा व मुख्य सरकारी वकील संदीप शिंदे यांनी याप्रकरणी शासनाची बाजू मांडली़ लोकसभा निवडणुकीला मतदान न करता आलेल्यांना विधानसभा निवडणुकीच्या वेळी फॉर्म नंबर ६ भरण्याचे आवाहन केले जाईल़ प्रसिद्धी माध्यमातून याची माहिती दिली जाईल, असे अॅड़ शिंदे यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले़ ते ग्राह्ण धरत न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठाने यावरील निकाल सोमवारी दिला जाईल, असे जाहीर केले़ मतदारयादीत नाव नसल्याने लोकसभेला मतदान न करता आलेले ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, त्यांची पत्नी चित्रा तसेच मुंबई व पुण्यातील काही मतदार व सामाजिक संघटनांनी पुन्हा मतदान करण्याची परवानगी देण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी करणार्या स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत़