मारकडवाडीत आज मतदान! निवडणूक पार पाडण्यासाठी नव्हे, तर रोखण्यासाठी पोलिसांची फौज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 07:51 AM2024-12-03T07:51:58+5:302024-12-03T07:52:49+5:30

आमदारांनी ठोकला गावातच मुक्काम, गावकऱ्यांना नोटिसा, सोमवारी दिवसभर गावाला छावणीचे स्वरूप आले होते. सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची गर्दी दिसत होती. मात्र, ग्रामस्थांनी मंडप उभारून तयारी सुरू असल्याचे चित्र दिसत असतानाच गावातील काही नेते मंडळींनी हजेरी लावली

Voting today in Markadwadi Malshiras Constituency! A police force not to conduct elections, but to prevent them | मारकडवाडीत आज मतदान! निवडणूक पार पाडण्यासाठी नव्हे, तर रोखण्यासाठी पोलिसांची फौज

मारकडवाडीत आज मतदान! निवडणूक पार पाडण्यासाठी नव्हे, तर रोखण्यासाठी पोलिसांची फौज

माळशिरस मारकडवाडी (ता. माळशिरस) ईएमव्ही मशिन व बॅलेट पेपर यांच्यातील रंगतदार सामना अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज सकाळपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. पोलिसांनी गावकऱ्यांना नोटिसा बजावत पोलिस बंदोबस्त वाढवला आहे, तर दुसरीकडे मंडप उभारून मतदान प्रक्रिया पार पाडण्याचा मानस गावकरी व्यक्त करीत आहेत.

मारकडवाडी गावकऱ्यांनी केलेल्या मतदान प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत नसल्याचा निर्वाळा प्रांताधिकाऱ्यांनी दिला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांकडे सहकार्य मागितले, मात्र ही बाब गैरकानूनी असल्याचे सांगत पोलिसांनी ग्रामस्थांना नोटिसा बजावल्या आहेत. सोमवारी दिवसभर गावाला छावणीचे स्वरूप आले होते. सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची गर्दी दिसत होती. मात्र, ग्रामस्थांनी मंडप उभारून तयारी सुरू असल्याचे चित्र दिसत असतानाच गावातील काही नेते मंडळींनी हजेरी लावली. यावेळी आमदार उत्तम जानकर यांनी उपस्थिती दर्शवीत परिस्थितीचा आढावा घेतला.

मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी निवडून आलेले आमदार उत्तम जानकर यांनी मंगळवारी मारकडवाडीत मुक्काम ठोकला. कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, असा इशारा त्यांनी दिला आहे.

कायदा हातात घेतल्यास गुन्हे होणार

मारकडवाडी गावातील ग्रामस्थामार्फत ईव्हीएम मशिनवर संशय असल्याने बॅलेट पेपरवर फेर मतदान होण्याबाबत परवानगी पोलिसांकडे मागितली होती. मात्र, यापूर्वी मतदान व मतमोजणी प्रक्रिया झालेली असून, अशा पद्धतीचे मतदान करता येणार नसल्याचा माहिती प्रांताधिकाऱ्याऱ्यांनी दिल्यामुळे अशा पद्धतीने कोणत्याही गावाला फेर मतदान प्रक्रिया करता येणार नाही. त्यामुळे आपण ही प्रक्रिया करण्याचा प्रयल केल्यास प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. आपण नियमांचे पालन करावे व आपली मागणी ही सनदशीर मार्गाने संबंधित विभागाकडून मान्य करून घ्यावी. गावात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणाविरुद्ध सदरची नोटीस गुन्ह्यात पुरावा म्हणून वापरण्यात येईल, अशा आशयाची नोटीस पोलिसांकडून काही गावकऱ्यांना बजावण्यात आली आहे.

ग्रामस्थांना मतपत्रिकेद्वारे मतांचा खात्री करावयाची आहे. यामध्ये कोणतेही गैर कृत्य नाही. मशिनमध्ये दोष नसेल, तर मतदान घेण्यास काय हरकत आहे, यासाठी पोलिस बाळाचा वापर करून मतदान थांबवून प्रशासन नेमके यातून काय साध्य करीत आहेत. हे मतदान कोणत्याही परिस्थितीत होणार असून, गुन्हे दाखल झाले, तर माझ्यावर पहिला गुन्हा पोलिसांना दाखल करावा लागेल. - उत्तम जानकर, आमदार, माळशिरस

Web Title: Voting today in Markadwadi Malshiras Constituency! A police force not to conduct elections, but to prevent them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.