कुलगुरूपदाचं बीज रुजता रुजेना...
By admin | Published: May 12, 2015 11:53 PM2015-05-12T23:53:20+5:302015-05-13T00:54:28+5:30
सहा महिन्यांपासून प्रभारी : दापोली कृषी विद्यापीठाला कुलगुरूंची प्रतीक्षा
शिवाजी गोरे - दापोली -राज्यातील कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचे आदेश रखडल्याने नव्या कुलगुरूपदाच्या निवडीला सध्यातरी पूर्णविराम मिळाला असून दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरूपद अद्यापही रिक्तच आहे. कुलगुरूपदाचे निकषसरकारने निश्चित न केल्यामुळे हे पद गेली ६ महिने रिक्त आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. किसन लवांडे २० डिसेंबरला सेवानिवृत्त झाले. त्यामुळे या पदासाठी सरकारने निवड समिती स्थापन केली. लवांडे निवृत्त होण्याअगोदर तीन महिने निवड समितीने जाहिरात देऊन उमेदवारी अर्ज मागविले. अर्जाची छाननी होऊन पात्र उमेदवारांच्या मुलाखतीसुद्धा घेतल्या होत्या. मात्र, पात्र उमेदवारच कुलगुरू पदाला लायक नसल्याचा शेरा मारून निवड समितीने पात्र उमेदवारांची निराशा केली. त्यानंतर सरकारने कुलगुरूनिवडीचे निकष काय असावेत, याबाबत चारही कृ षी विद्यापीठांकडून सल्ला घेऊन कुलगुरू पदाबद्दल नवीन निकष लावण्याबाबत विचारविनिमय सुरू केला. पूर्वीचा संचालक पदाचा कार्यकाल पाच वर्षांचा होता.
मात्र, यामध्ये राज्यात एकही पाच वर्ष निकष पूर्ण करणारा संचालक न मिळाल्याने राज्यातील कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचे निकष बदलून ३ वर्ष संचालक किंवा ८ वर्षे प्राध्यापक पदाचा अनुभव ही अट लागू करण्याबाबत शासनदरबारी हालचाली सुरू झाल्या; परंतु हा आदेशसुद्धा बाहेर न
पडल्याने दापोली कृषी विद्यापीठाला हक्काचा कुलगुरू मिळणार कधी ? असा सवाल केला जात आहे.
कामे रखडली
दापोली कृषी विद्यापीठाला कुलगुरूनसल्याने कामेसुद्धा रखडली आहेत. त्यामुळे नव्या निकषात पद भरण्याची मागणी होत आहे. निकष ठरवा व भरती घ्या, अशी मागणी व्यक्त होत आहे.