वडाळा रोड ते बॅलार्ड पियर प्रस्ताव निर्णयाविना
By Admin | Published: February 23, 2015 03:13 AM2015-02-23T03:13:11+5:302015-02-23T03:13:11+5:30
सीएसटीवरील ताण कमी करण्यासाठी हार्बरचा विस्तार बॅलार्ड पियरपर्यंत करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) घेतला आहे
मुंबई : सीएसटीवरील ताण कमी करण्यासाठी हार्बरचा विस्तार बॅलार्ड पियरपर्यंत करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) घेतला आहे. यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीचा वापर केला जाणार असून अद्याप त्यावर तोडगा निघालेला नसल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.
सीएसटी ते अंधेरी तसेच पनवेल, वाशीपर्यंत हार्बरचा पसारा आहे. अंधेरीपर्यंत असलेली हार्बर गोरेगाव आणि त्यानंतर बोरीवलीपर्यंत वाढविण्यात येणार आहे. गोरेगावपर्यंत विस्ताराचा प्रकल्प एमयुटीपी-२ मध्ये तर बोरीवलीपर्यंत विस्ताराचा प्रकल्प एमयुटीपी-३ मध्ये समावेश करण्यात आला आहे. यातील हार्बरवरील गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचे काम सुरु असून येत्या काही महिन्यात ते पूर्ण होईल, अशी माहीती रेल्वे अधिकाऱ्यांकडून वारंवार देण्यात येत आहे. या प्रकल्पात ओशिवरा या नविन स्थानकाचा समावेश केला जाणार आहे. डाऊन दिशेला हार्बरचा विस्तार होत असतानाच अप दिशेला म्हणजे बॅलार्ड पियरपर्यंतही त्याचा विस्तार करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला आहे. या प्रकल्पानुसार वडाळा स्थानक हा बॅलार्ड पियअला जोडण्यात येईल. प्रकल्पाचा एमयुटीपी-३ मध्ये नव्याने समावेश करण्यात आला असून प्रकल्पासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट्रची जमिन लागणार आहे. त्यासाठी पोर्ट ट्रस्टकडे रेल्वेची बोलणीही सुरु असून यासाठी राज्य सरकारकडेही बोलणी केली जात आहे. (प्रतिनिधी)