वाधवान बंधूंचा आता ताबा ‘सीबीआय’कडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 06:07 AM2020-04-27T06:07:07+5:302020-04-27T06:07:30+5:30
कपिल व धीरज वाधवानला ताब्यात घ्यावे या आशयाचे १० दिवसाअगोदरच ‘सीबीआय’ला पत्र पाठविले होते. त्यांचा ‘क्वॉरंटाईन’चा कालावधी संपला होता.
नागपूर : ‘येस बँक’ घोटाळ््याप्रकरणी जामिनावर बाहेर असलेले ‘डीएचएफएल’चे प्रवर्तक कपिल व धीरज वाधवान यांचा रविवारी दुपारी साताऱ्यात ‘सीबीआय’कडे ताबा देण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी येथे दिली. ‘लॉकडाउन’च्या कालावधीत हे दोघेही कुटुंबीयांसह आपत्कालीन स्थितीचे कारण देत मुंबईहून महाबळेश्वरला पोहोचले होते. त्यांच्या इतर कुटुंबीयांना ‘होम क्वॉरंटाइन’ करण्यात आले आहे.
गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची परवानगी घेऊन वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला गेले होते. ही बाब समोर येताच त्यांना ‘क्वॉरंटाइन’ करण्यात आले होते. कपिल व धीरज वाधवानला ताब्यात घ्यावे या आशयाचे १० दिवसाअगोदरच ‘सीबीआय’ला पत्र पाठविले होते. त्यांचा ‘क्वॉरंटाईन’चा कालावधी संपला होता. रविवारी दुपारी ३.३० वाजता साताºयाच्या पोलीस अधीक्षकांनी त्यांना ‘सीबीआय’च्या ताब्यात दिले. सोबतच मुंबईपर्यंत सुरक्षेसाठी पोलीसदेखील दिले, अशी माहिती अनिल देशमुख यांनी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून दिली.
अमिताभ गुप्ता यांनी जे पत्र दिले होते त्याची चौकशी करण्याची जबाबदारी अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडे होती. त्यांचा अहवाल रविवारीच प्राप्त झाला. संबंधित पत्र हे गुप्ता यांनी कुठल्याही दबावात न येता स्वत: दिल्याचे चौकशीत कबूल केले होते. या अहवालाची रीतसर फाईल तयार होईल व माझ्याकडे तसेच मुख्यमंत्र्यांकडे जाईल. त्यानंतरच अहवालावर निर्णय घेण्यात येईल. हा अहवाल लवकरच आम्ही सार्वजनिकदेखील करू, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणावरुन जे राजकारण करण्यात आले ते दुर्दैवी होते. पत्र कुणाच्या तरी दबावातून देण्यात आले असे तर्कवितर्क लावण्यात आले. राज्य ‘कोरोना’चा सामना करत असताना राज्याचे नेतृत्व केलेले लोकच राजकारण करत असतील ही दु:खद बाब आहे, असे देखील ते म्हणाले.
-------------
त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत
राज्यातील पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल टाकून ‘कोरोना’मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करत आहे. दोन पोलीस कर्मचाºयांचा ‘कोरोना’मुळेच मृत्यू झाला. शासन त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. शासनाच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाखांची मदत करण्यात येईल. शिवाय कुटुंबातील एकाला नोकरी व नियमानुसार इतर सहकार्य करण्यात येईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. मुंबईतील दोन इस्पितळे पोलीस यंत्रणेसाठी राखून ठेवली आहेत, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.