वेतनसुधारणा समितीची टुरटुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2017 04:05 AM2017-02-13T04:05:45+5:302017-02-13T04:05:45+5:30
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ मिळावी, यासाठी पगारवाढीसंदर्भात वेतनश्रेणी अभ्यास समितीची स्थापना
मुंबई : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ मिळावी, यासाठी पगारवाढीसंदर्भात वेतनश्रेणी अभ्यास समितीची स्थापना गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात करण्यात आली. मात्र, ही स्थापना केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सहा महिन्यांत समितीकडून देशभर दौरे करण्यात आले. यातील प्रत्येक दौऱ्यांसाठी लाखोंचा खर्च करण्यात आला, परंतु अद्याप शिफारसी अहवाल मात्र सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे एसटी कामगार संघटनांकडून नाराजीचा सूर लावण्यात आला आहे.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत कोणतीच रचनात्मक व्यवस्था नसून, दर चार वर्षांनी विशिष्ट पद्धतीने कामगारांना वेतनवाढ दिली जाते. कामाचे स्वरूप आणि मिळणारे वेतन याचा संबंध जुळवून वेतननिश्चिती झाली पाहिजे. याच उद्देशाने वेतन अभ्यास गटाची निर्मिती जुलै २0१६ रोजी करण्यात आली. या वेतन अभ्यासगटाचे अध्यक्ष डी.आर.परिहार आणि अन्य अधिकारी असून, जुलै महिन्यात या समितीची दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती. त्यात समितीला वेतनवाढीसंदर्भात अहवाल सादर करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना करतानाच, चार महिन्यांत अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती दिली, परंतु अहवाल सादर न झाल्याने समितीने फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मागितली. फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला, तरी समितीकडून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या अभ्यासासाठी देशभर दौरे करून माहिती घेण्याचा अजब प्रकार केला आहे. बेंगलोर, कर्नाटक, आंध्र प्रदेश, चैन्नई, उत्तर प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश यासह अन्य राज्यांत दौरे केले आहेत. यातील प्रत्येक दौऱ्यासाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे, एसटीचे स्टेनो टायपिस्ट मदतीला न घेता, बाहेरून स्टेनो टायपिस्ट घेऊन त्याचा सुमारे ६0 हजार रुपये भत्ताही मिळवला आहे. गेल्या सहा महिन्यांत असा खर्च केल्यानंतरही अहवालाबाबत समितीकडून चिडीचूप राहाणेच पसंत केले आहे. त्यामुळे एवढे दौरे केल्यानंतर तरी कामगारांचा पगार वाढणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)