वाघिणीचा मारेकरी मोकाट !
By admin | Published: January 29, 2017 09:03 PM2017-01-29T21:03:09+5:302017-01-29T21:03:09+5:30
पंधरा दिवसांपूर्वी खापा या एकाच वन परिक्षेत्रात एक वाघीण, दोन बिबटे आणि दोन हरणांच्या शिकारीच्या घटना पुढे आल्या आहेत.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 29 - मागील पंधरा दिवसांपूर्वी खापा या एकाच वन परिक्षेत्रात एक वाघीण, दोन बिबटे आणि दोन हरणांच्या शिकारीच्या घटना पुढे आल्या आहेत. यानंतर प्राथमिक चौकशीतून बिबट्यांवर विषप्रयोग आणि वाघिणीला विजेचा शॉक
देऊन ठार केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावर संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला. मात्र यानंतर वनविभाग अचानक गप्प झाला असून, वाघिणीचा मारेकरी खुलेआम मोकाट फिरत आहे. एवढेच नव्हे, तर खापा वन परिक्षेत्रातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरूद्ध सुद्घा कोणतीही कारवाई झालेली नाही. यामुळे एकूणच नागपूर वन विभागाच्या भूमिकेवर संशय
व्यक्त केला जात आहे.
मागील १० जानेवारी रोजी खापा वन परिक्षेत्रात दोन बिबट्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्या बिबट्यांवर विषप्रयोग झाला होता. यानंतर लगेच १३ जानेवारी रोजी पुन्हा एक वाघीण आणि दोन हरणांचा मृतदेह आढळून आला होता. या सर्व प्राण्यांची विजेच्या शॉकने मृत्यू झाला होता. चौकशीत एका शेतकऱ्याने आपल्या शेतात ते विजेचे तार लावले असल्याचे आढळून आले होते.
त्यावर संबंधित आरोपीविरूद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. मात्र यानंतर खापा येथील वन परीक्षेत्र अधिकारी तागडे यांनी कधीही त्या आरोपीला गजाआड करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे घटनेला तब्बल पंधरा दिवसापेक्षा अधिकचा कालावधी लोटून सुद्धा अजूनपर्ययंत आरोपी हाती लागलेला नाही. माहिती सूत्रानुसार आरोपी याच संधीचा फायदा घेवून खुलेआम जामिनासाठी मोकाट फिरत असल्याची माहिती पुढे आली आहे.