शेताच्या कुंपणात अडकली वाघीण
By admin | Published: January 8, 2015 01:18 AM2015-01-08T01:18:48+5:302015-01-08T01:18:48+5:30
येथून जवळच असलेल्या मामला-बोर्डा शेतशिवारातील एका शेताच्या कुंपणामध्ये वाघीण अडकली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. वाघिणीला निघता येत नसल्याने
शर्थीचे प्रयत्न : दोन तासानंतर काढण्यात वन विभागाला यश
चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या मामला-बोर्डा शेतशिवारातील एका शेताच्या कुंपणामध्ये वाघीण अडकली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. वाघिणीला निघता येत नसल्याने ती सतत ओरडत होती. यामुळे बघ्यांनी एकच गर्दी केली. अखेर वन विभागाने शर्थीचे प्रयत्न करून तिला सुखरुप बाहेर काढले.
बुधवारी पहाटे मामला-बोर्डा शेतशिवारातून वाघाच्या ओरडण्याचा आवाज आल्याने उत्सुकतेपोटी गावकऱ्यांनी शिवाराकडे धाव घेतली असता शेताच्या कुंपणामध्ये वाघ अडकलेला दिसला. अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वन विभागाला या संदर्भात माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांचा ताफा हजर झाला. मात्र नागरिकांच्या गर्दीमुळे त्यामुळे वन विभागाला काम करणे अशक्य झाले होते. अखेर पोलीस तथा दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करावे लागले.
उपसंचालक (बफर) नरवाणे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक बी. के. गरड आदींसह अन्य अधिकाऱ्यांनी भेट दिली. वाघिणीची तळमळ सुरु होती. मात्र जवळ जाण्याची हिंमत कुणाचीच होत नव्हती. तिला सोडविण्यासाठी वन विभागाच्या रेस्क्यू टीमने बराच काळ प्रयत्न केले. अखेर वन परिक्षेत्राधिकारी बलकी आणि डॉ. खोब्रागडे यांनी बधिरतेचे इंजेक्शन देऊन सोडविण्यात यश मिळविले. त्यानंतर पिंजऱ्यात बंद करून रामबाग नर्सरीत आणण्यात आले. सायंकाळच्या सुमारास शुद्धीवर आल्यावर तिने थोडा आहार घेतल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.
सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. सकाळी ११ वाजताच्या सुमारास सुरू झालेले हे रेस्क्यू आॅपरेशन दुपारी दीड वाजेपर्यंत सुरु होते. फासातून निघण्याच्या प्रयत्नात ती कमरेमध्ये अडकली.
मध्येच फसल्याने तिला मागेही येता येत नव्हते, अथवा पुढेही जाता येत नव्हते. सुटकेसाठी धडपड केल्याने वाघीण प्रचंड बिथरलेली होती. (प्रतिनिधी)