वायकर-निरुपम वाद पेटला
By admin | Published: July 12, 2016 03:50 AM2016-07-12T03:50:02+5:302016-07-12T03:50:02+5:30
आरे येथील कथित अनधिकृत व्यायामशाळा तसेच जोगेश्वरी येथील एसआरएविषयी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पुराव्याशिवाय केवळ बिनबुडाचे आरोप केले आहेत
मुंबई : आरे येथील कथित अनधिकृत व्यायामशाळा तसेच जोगेश्वरी येथील एसआरएविषयी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पुराव्याशिवाय केवळ बिनबुडाचे आरोप केले आहेत. निरुपम यांनी १५ दिवसांत जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांच्यावर १० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा शिवसेना आमदार व गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.
वायकर म्हणाले की, आमदार निधीतून आरे येथील व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. त्यातून आर्थिक लाभ घेतला नाही. व्यायामशाळेचे व्यवस्थापन करणारी संस्था १९९४पासून नोंदणीकृत आहे. येथे ४० खोल्या बांधल्या, २० एकर जागा हडपली, असे खोटे आरोप निरुपम यांनी केले. मात्र, पत्रकारांनाही या ४० खोल्या आढळल्या नाहीत. निरुपम यांनी एकतर आरोप सिद्ध करावेत अन्यथा जाहीर माफी मागावी, असे आव्हान वायकर यांनी दिले.
एसआरए प्रकल्पाच्या कंपनीतून मी २०११ सालीच बाहेर पडलो. याबाबतची माहिती निवडणुकीच्या शपथपत्रात दिल्याचे वायकर यांनी स्पष्ट केले. निरुपम यांना कार्यालयात आणि घरी कायदेशीर नोटीस बजावल्याचे वायकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)