४-५ महिने थांबा, मला सरकार बदलायचंय; शरद पवारांचं मोठं विधान, मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 05:51 PM2024-06-12T17:51:07+5:302024-06-12T17:51:52+5:30
लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी पवारांनी देशासह राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
पुणे - Sharad Pawar on Narendra Modi ( Marathi News ) शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल. ४-५ महिने द्या, मला सरकार बदलायचंय. सरकार बदलल्याशिवाय आपल्याला पाहिजे तशी धोरणं घेता येत नाही असं मोठं विधान शरद पवार यांनी केले आहे. इंदापूर येथे शेतकऱ्यांशी शरद पवारांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, गेली दहा वर्ष सत्ता होती पण आज चित्र बदलले. आज लोकांनी सत्ता त्यांच्या हाती दिली पण त्यांना बहुमत मिळालं नाही. चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांची मदत नसती तर त्यांचे सरकार झाले नसते. त्या दोघांच्या मदतीने आज त्याठिकाणी सरकार झालं. समाजाच्या सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र पुढे घेऊन जायचं ही विचारधारा आपल्या सर्वांच्या अंत:करणात आहे. नेमके त्याविरोधी काम आजचे राज्यकर्ते करतायेत असं त्यांनी म्हटलं.
तसेच मला महाराष्ट्राच्या विधानसभेत, देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत, विधान परिषदेत जाऊन यंदाच्या वर्षी ५६ वर्षे झाली. या काळात एकही दिवसाचा खाडा न घेता निवडून आलेला दुसरा कुणी नाही. त्यामुळे या काळात अनेक पंतप्रधान पाहिले. पक्षभिन्नता असेल पण देशाचा विचार कुणी सोडला नाही. समाजातील सगळ्या धर्माच्या, जातीच्या भाषेच्या लोकांबद्दल त्यांना एक प्रकारची धोरणात्मक निर्णय घ्यायची आवश्यकता होती पण त्यांची निर्णय पद्धत समाजातील काही घटकांबद्दल मनामध्ये आकस असावा अशी होती असं सांगत पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता निशाणा साधला.
दरम्यान, देशातील राजकारण बदलतंय, गेले १० वर्ष विशिष्ट राजवट देशामध्ये होती. आजही त्यांच्या हाती सत्ता गेलेली आहे. पण १० वर्षाची सत्ता आणि यावेळच्या सत्तेत फरक आहे. देशातील राज्यातील विरोधी पक्षाचे लोक एकत्रित करणे, विरोधासाठी विरोध नाही तर राज्यातील जनतेच्या हिताची जपणूक करणे, जर राज्यकर्त्यांकडून होत नसेल तर गप्प बसायचे नाही. लोकशाहीच्या चौकटीत बसून आपली मते मांडायची हे करण्यासाठी जबरदस्त विरोधी पक्ष आज हवा आहे. तो उभा करण्याची कामगिरी आम्ही सगळे मिळून करू असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.