बेस्ट कामगारांची प्रतीक्षा संपली
By admin | Published: March 22, 2017 02:35 AM2017-03-22T02:35:51+5:302017-03-22T02:36:02+5:30
संपाचे हत्यार उपसण्याची तयारी सुरू होताच बेस्ट प्रशासनाने कर्मचाऱ्यांना मंगळवारी पगार दिला. फेब्रुवारी महिन्याचा पगार तब्बल २० दिवसांनंतर हाती
मुंबई : संपाचे हत्यार उपसण्याची तयारी सुरू होताच बेस्ट प्रशासनाने कर्मचाऱ्यांना मंगळवारी पगार दिला. फेब्रुवारी महिन्याचा पगार तब्बल २० दिवसांनंतर हाती आल्यामुळे कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र आर्थिक संकटात असलेल्या बेस्टच्या तिजोरीवर कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी १४० कोटी रुपयांचा भार पडला आहे.
कर्जबाजारी असलेल्या बेस्ट उपक्रमामध्ये कर्मचाऱ्याचा पगार प्रत्येक महिन्याच्या ८ ते १० तारखेपर्यंत होतो. मात्र या वेळेस २० दिवस उलटले तरी पगार होत नसल्याने बेस्ट कर्मचारी हवालदिल झाले होते. बँकांकडून कर्ज काढून दर महिन्यात पगार दिला जातो. मात्र या वेळेस काही हालचालीच नसल्याने कामगारांचे टेन्शन वाढले होते. अखेर पगारासाठी संपाचे हत्यार कामगार संघटनांनी उपसले. त्यानुसार २२ मार्चपासून बंद पुकारण्याची तयारी बेस्टमध्ये सुरू झाली होती.
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मध्यस्थी करून बेस्ट कामगारांचा पगार २१ व २२ मार्चपर्यंत मिळेल, असे जाहीर केले होते. त्यानुसार बेस्टच्या वाहतूक विभागाचे कामगार, वाहनचालक, कंडक्टर तसेच विद्युत पुरवठा विभागाचे कर्मचारी अशा ३१ हजार कामगार-कर्मचाऱ्यांचा पगार मंगळवारी झाला आहे. तर अधिकारी वर्गाचा पगार बुधवारी दिला जाणार आहे. बेस्टमध्ये ४४ हजार कामगार व अधिकारी वर्ग आहे. (प्रतिनिधी)