राज्यात दीड लाख शेतकऱ्यांना कृषिपंप जोडणीची प्रतीक्षा
By admin | Published: May 23, 2015 01:21 AM2015-05-23T01:21:30+5:302015-05-23T01:21:30+5:30
राज्यात कृषिपंप वीज जोडणीचे १ लाख ६० हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक रक्कम भरली असून, सर्व त्रुटी दूर केल्या आहेत.
विवेक चांदूरकर - अकोला
राज्यात कृषिपंप वीज जोडणीचे १ लाख ६० हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक रक्कम भरली असून, सर्व त्रुटी दूर केल्या आहेत. आता शासनाकडे निधी नसल्यामुळे वीज जोडणी मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले़ एकीकडे सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याचा डांगोरा शासनाच्या वतीने पिटण्यात येतो, तर दुसरीकडे विहिरीत पाणी असल्यावरही शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे.
सिंचनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या धरणांमधील पाणी पिण्याकरिता उपयोगात आणले जाते. त्यामुळे शेतकरी सिंचन करू शकत नाहीत. शेतातील विहिरीत पाणी असल्यावरच शेतकरी कृषिपंप जोडणीसाठी अर्ज सादर करतात. विद्युत जोडणी मिळाली तर निश्चितच सिंचनात वाढ होईल व त्यांना फायदा होईल; मात्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याला प्राधान्य देण्यात येत नाही. चार ते पाच वर्षांपूर्वी कृषिपंप जोडणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करून आवश्यक पैसे भरले व सर्व निकष पूर्ण केले आहेत. अशा १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना आजही वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे महावितरण आपल्या कामाची वाहवा करीत आहे. २००५ मध्ये राज्यात नऊ लाख कृषिपंप जोडणीचे अर्ज प्रलंबित होते. त्यापैकी लाखो अर्ज निकाली काढून कृषिपंपांना वीज जोडणी देण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात येते. दरम्यान, धरणामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतामधील विहिरींची पाण्याची पातळी वाढते व शेतकरी त्या पाण्यातून सिंचन करू शकतात.