प्राथमिक अहवालाच्या मंजुरीची प्रतीक्षा
By admin | Published: September 19, 2016 05:35 AM2016-09-19T05:35:48+5:302016-09-19T05:35:48+5:30
मध्य रेल्वेवरील सीएसटी ते पनवेल फास्ट कॉरिडोर आणि पश्चिम रेल्वेवरील वांद्रे ते विरार हे दोन्ही एलिव्हेटेड प्रकल्पांची कामे लवकरच सुरू होतील
मुंबई : लोकल प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले मध्य रेल्वेवरील सीएसटी ते पनवेल फास्ट कॉरिडोर आणि पश्चिम रेल्वेवरील वांद्रे ते विरार हे दोन्ही एलिव्हेटेड प्रकल्पांची कामे लवकरच सुरू होतील. मात्र तत्पूर्वी या प्रकल्पांचा प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्डाकडे जुलै महिन्यात सादर केल्यानंतर त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा एमआरव्हीसीला (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) आहे.
रखडलेला चर्चगेट ते विरार एलिव्हेटेड आणि सीएसटी ते पनवेल फास्ट कॉरिडोर प्रकल्प मार्गी लावण्यासंदर्भात नुकतीच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली होती. या बैठकीत पश्चिम रेल्वेवरील एलिव्हेटेड प्रकल्प वांद्रे ते विरार आणि त्यानंतर वांद्रे ते चर्चगेट प्रकल्प असा दोन टप्प्यात पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर सीएसटी ते पनवेल रेल्वे आणि रोड असा मल्टिमॉडल एलिव्हेटेड कॉरिडोरही बांधण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर हे दोन्ही प्रकल्प एमआरव्हीसीकडून मार्गी लावण्यासाठी पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दोन्ही एलिव्हेटेड प्रकल्प एमआरव्हीसीच्या अखत्यारीत येत असल्याने, त्यांनी या प्रकल्पांचे सुधारित प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारकडे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, दोन्ही एलिव्हेटेड प्रकल्पांचा प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारकडे जुलै महिन्यात पाठविला. यासंदर्भात एमआरव्हीसीचे प्रवक्ता प्रभात रंजन यांनी सांगितले की, एलिव्हेटेड व फास्ट कॉरिडोर प्रकल्पाच्या प्राथमिक अहवालाबाबत रेल्वे बोर्डाकडून मंजुरीविषयी काही माहिती देण्यात आलेली नाही. त्याचीच प्रतीक्षा असून, प्रकल्पातील बदल त्यांच्याकडून सुचविण्यात येतील. बदल नसल्यास तोच अंतिम अहवाल असेल, असे ते म्हणाले.