महर्षींच्या गावी मुलभूत सुविधांची प्रतीक्षा
By Admin | Published: November 16, 2015 09:42 PM2015-11-16T21:42:29+5:302015-11-17T00:03:08+5:30
मुरूड : महिलांच्या शिक्षणासाठी चळवळ उभारणारे कोकणचे ‘भारतरत्न’ सरकारकडून दुर्लक्षित मोठ्यांची छोटी गावं...
गावाने त्यांना झिडकारले होते
स्त्री शिक्षणासाठी व बहुजन समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी सुरु केलेले प्रयत्न लोकांना खटकत असावेत. परंतु, अशा परिस्थितीत त्यांनी गावच्या हितासाठी व समाजाच्या कल्याणासाठी आपले प्रयत्न सुरुच ठेवले. १८८६ साली मुरुड गावच्या कल्याणासाठी ‘मुरुड फंड’ नावाची संस्था त्यांनी स्थापन केली होती. पुणे येथे महिलांच्या शिक्षणाचे कार्य वाढल्यानंतर त्यांना पैशाची चणचण भासू लागली. त्यामुळे त्यांच्या हयातीतच मुरुड येथील घरसुद्धा त्यांनी विकले होते. त्यामुळे त्यांना मुरुड येथे हक्काचे घर नव्हते. तरीसुद्धा ते शेवटपर्यंत आपल्या नातेवाईकांकडे मुरुड येथे येत असत. देशभर त्यांचे नाव झाल्यानंतर कधी काळी झिडकारलेल्या गावानेसुद्धा त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जाहीर सत्कार केला होता. या सत्काराच्यावेळी त्यांची बैलगाडीतून मिरवणूकही काढण्यात आली होती. ज्या लोकांनी त्यांना वाळीत टाकलं होतं, ते लोकसुद्धा जाहीर सत्काराला उपस्थित होते, असे ग्रामस्थ सांगतात.
महर्षींचे कर्वे यांचे कार्य
भारतरत्न महर्षी अण्णासाहेब उर्फ धोंडो केशव कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल १८५८ रोजी झाला. स्त्री शिक्षणासाठी आणि विधवांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. अण्णासाहेबांचे बालपण व प्राथमिक शिक्षण मुरुड येथे झाले. १८७६ साली मराठी सहावी, १८८१ साली मॅट्रिक, १८८४ साली बी. ए., १८९१ साली फर्ग्युसन कॉलेज येथे गणिताचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. १८९१ मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नी राधाबाई यांचा मृत्यू झाला. १८९३ मध्ये त्यांनी आनंदीबाई (गोदूबाई) यांच्याशी विधवा पुनर्विवाह केला. समाजाच्या तत्कालीन रुढीविरुद्ध हा विवाह असल्याने पती-पत्नीचा समाजाने अतोनात छळ केला. १८९३ मध्ये त्यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली. स्त्रिया, मुलींना व विधवांना शिक्षीत केल्याशिवाय त्यांना समाजात सन्मानाने जगता येणार नाही हे ओळखून त्यांनी मुलींच्या शिक्षणास प्राधान्य दिले. शिक्षणाचे कार्य त्या अगोदरच सुरु झाले असले तरी त्यांनी या कार्याला गती दिली. समाजातील अनाथ बालिकांच्या शिक्षण व निवासासाठी १८९९ साली त्यांनी अनाथ बालिकाश्रम सुरु केले. १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना केली. १९१६ साली महिला विद्यापीठाची स्थापना केली. या साऱ्यासाठी कष्टाबरोबरच पैशांचीही निकड होती. त्यासाठी त्यांनी त्रिखंड प्रवास केला. समाजाकडून हीन वागणूक देण्यात येणाऱ्या दुर्दैवी, अशिक्षीत विधवांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी अण्णांनी कल्पवृक्षाची लागवड केली. या कल्पवृक्षाने अनेक विधवांना सावली दिली आहे.
महर्षींना मिळालेले सन्मान
आयुष्यभर कष्टमय जीवन जगून त्यांनी आपले ध्येय गाठले. अशा या थोर समाजसेवकाला त्यांच्या कार्याबद्दल अनेक सन्मान प्राप्त झाले. १९५१ साली पुणे विद्यापीठाने त्यांना डी. लिट. पदवी दिली. १९५४ साली महिला विद्यापीठाने डी. लिट, १९५५ साली पद्मभूषण आणि ‘भारतरत्न’ असे सर्वोच्च किताब देऊन गौरविण्यात आले. त्यानंतरच दोनच वर्षांनी १९५७ साली मुंबई विद्यापीठाने एल. एल. डी. ही पदवी देऊन गौरविले. १०४ वर्षे आयुष्य लाभलेल्या महर्षीच्या कार्याचे अनेक पैलू आहेत. मुरुड फंड, निष्काम मठ, महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ आणि जातीभेद निर्मूलनासाठीचा त्यांचा लढा अवर्णनीय होता. हे उपक्रम केवळ सुरू करून ते थांबले नाहीत, तर ते पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारचे कष्ट त्यांनी सहन केले आणि आपले जीवन सत्कारणी लावले. भारताच्या सामाजिक सुधारणांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा महर्षी कर्वे यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेले दिसेल, अशा या कर्तृत्ववान माणसाला कोटी कोटी प्रणाम करावे लागेल.
गावात हवी महिला सक्षमीकरणाची चळवळ
भारतरत्नांच्या गावात भारतरत्नांचे स्मारक नाही, त्यांच्या कामाचे प्रतिबिंब उमटेल व त्यांची आठवण राहिल, असे कोणतेही काम शासनाकडून झालेले नाही. या गावापासून महर्षींनी महिला शिक्षणाची चळवळ उभी केली. महर्षींच्या गावात विधवा पुनर्वसन केंद्र, महिला विद्यापीठाची शाखा, स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला प्रशिक्षण केंद्र, स्वयंरोजगार केंद्र सुरु होण्याची गरज आहे. मात्र, भारतरत्नांच्या गावाकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ‘मुुरुड’ गाव भारतरत्न महर्षी कर्वे यांचे गाव असले तरीही सर्वसामान्य गावाप्रमाणेच असल्याने या गावाला भेट देणारे येथील असुविधांमुळे निराश होतात.
उदासिनता सर्वच स्तरावर
महर्षी कर्वे यांनी केलेले कार्य कोणत्या एका भागासाठी केलेले नाही. त्यांनी रोवलेली महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ ही सर्वांनाच आदर्शवत् ठरली आहे. त्यातून प्रेरणा घेऊन अनेकांनी महिला शिक्षणाच्या चळवळीला गती दिली आहे. पण त्या महर्षींच्या कार्याचा आदर करण्याबाबत सर्वांनीच उदासिनता दाखवली आहे.