‘सेंटर आॅफ एक्सलन्स’ची प्रतीक्षा
By admin | Published: March 5, 2016 12:48 AM2016-03-05T00:48:59+5:302016-03-05T00:48:59+5:30
फिल्म अॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआयआय) ला ‘सेंटर आॅफ नॅशनल एक्सलन्स’चा दर्जा देण्याच्या तत्कालीन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घोषणेला दोन वर्षांचा कालावधी लोटला
पुणे : फिल्म अॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआयआय) ला ‘सेंटर आॅफ नॅशनल एक्सलन्स’चा दर्जा देण्याच्या तत्कालीन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घोषणेला दोन वर्षांचा कालावधी लोटला, तरी त्याला मुहूर्त लागलेला नाही. माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून या संदर्भातील प्रस्ताव मनुष्यबळ विकास खात्याच्या दफ्तरी दाखल झाला असून, प्रक्रियेची गाडी पुढे सरकलेली नाही. चित्रपटक्षेत्राचा भक्कम आधारस्तंभ असलेले ‘एफटीआयआय’ हा दर्जा मिळण्याच्या अजूनही प्रतीक्षेतच आहे.
‘एफटीआयआय’सह कोलकात्याच्या सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एसआरएफटीआय) आणि इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशन (आयआयएमसी) यांना ‘सेंटर आॅफ नॅशनल एक्सलन्स’चा दर्जा देण्याचे आश्वासन माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आले होते.
मंत्रालयाने सेंट्रल युनिव्हर्सिटी अॅक्टप्रमाणे केलेल्या प्रस्तावाची चाचपणी मनुष्यबळ खात्याकडून केली जाईल, असे सांगण्यात आले होते; मात्र ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांनी गजेंद्र चौहान आणि इतर सदस्यांच्या नियुक्तीवरून छेडलेल्या आंदोलनामुळे या घोषणेकडे केंद्र सरकारचे साफ दुर्लक्ष झाले. मनुष्यबळ विकास खात्याकडे पाठविलेला हा प्रस्ताव चर्चेच्या स्वरूपातच आहे.
(प्रतिनिधी)
> उच्च शिक्षण, संशोधनाची दालने होतील खुली
आजची परिस्थिती अशी आहे की, ‘एफटीआयआय’ ही स्वायत्त संस्था असल्याने डिप्लोमा अभ्यासक्रमांना यूजीसीची मान्यता नाही. त्यामुळे पदव्युत्तर पदवी डिप्लोमा असूनही विद्यार्थ्यांना स्वत:च्या विषयांमध्ये पीएच.डी अथवा संशोधन करता येणे शक्य नाही.
या दृष्टीने ‘एफटीआयआय’ला सेंट्रल युनिव्हर्सिटी अॅक्टनुसार ‘सेंटर आॅफ एक्सलन्स’चा दर्जा मिळाल्यास ‘एफटीआयआय’ला शैक्षणिक दर्जा मिळण्याबरोबरच विद्यापीठांच्या सोयीसुविधा प्राप्त होतील आणि विद्यार्थ्यांना देशासह बाहेरही उच्च शिक्षण आणि संशोधनाची दालने खुली होतील.
मात्र, ही घोषणा करून आज दोन वर्षे उलटली, तरी त्याचे पुढे काही झालेले नाही. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला ‘एफटीआयआय’ला ‘सेंटर आॅफ एक्सलन्स’चा दर्जा देण्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सांगितले होते. माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून मनुष्यबळ विकास खात्याकडे गेलेल्या प्रस्तावाचे घोंगडे अद्यापही भिजतच पडले आहे. ‘एफटीआयआय’ला हा दर्जा मिळणार, तरी कधी याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांसह ‘एफटीआयआय’चेप्रशासन करीत आहे.
एफटीआयआयला ‘सेंटर आॅफ एक्सलन्स’चा दर्जा देण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मंत्रालयाकडून मनुष्यबळ विकास खात्याकडे प्रस्ताव गेलेला आहे; मात्र ही प्रक्रिया कशामुळे थांबली आहे, हेच कळत नाही. संसदेमध्ये विधेयक मंजूर झाल्यानंतरच हा दर्जा मिळू शकणार आहे.
- उत्तमराव बोडके, कुलसचिव, एफटीआयआय