चंदूच्या वापसीची प्रतीक्षा, चव्हाण परिवाराची दिवाळी अंधारात
By admin | Published: October 30, 2016 06:17 PM2016-10-30T18:17:19+5:302016-10-30T18:17:19+5:30
सामनेर येथील मूळ रहिवासी असलेला व पाकिस्तानच्या तावडीत सापडलेला भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण अद्याप न परतल्याने चव्हाण परिवाराची दिवाळी अंधारात
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 30 - सामनेर येथील मूळ रहिवासी असलेला व पाकिस्तानच्या तावडीत सापडलेला भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण अद्याप न परतल्याने चव्हाण परिवाराची दिवाळी अंधारात आहे.
चंदू चव्हाणला बेपत्ता होवून जवळपास एक महिना उलटूनही काही ठोस पावले उचलली गेली नाही. त्याला परत आणावे यासाठी चव्हाण परिवाराने संबंधित खात्यातील मंत्री, मनोहर परिकर, सुषमा स्वराज, सुभाष भामरे यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी केवळ आश्वासने दिली. मात्र उपयोग झाला नाही. यामुळे चंदू चव्हाण याचे काका , आत्या व भाऊबंद यांची दिवाळी पूर्णपणे अंधारात आहे. गावात चव्हाण भाऊबंदकीची सुमारे ७० घरे असून सर्वांनीच दिवाळी साजरी न करण्याचे ठरविले आहे. एवढेच नव्हे तर सामनेर गावात दिवाळी सण असल्यासारखे वाटत नाही. ग्रामस्थांची फक्त नावालाच दिवाळी आहे. पाहिजे तसा उत्साह नाही. जोपावेतो आमचा चंदू परत येत नाही तोपावेतो कोणतेही सण साजरे करणार नाही असे त्याचे काका नारायण चव्हाण यांनी सांगितले. ज्या दिवशी चंदू परत येईल तो दिवस आमच्यासाठी दिवाळीचा असेल असेही या परिवाराचे म्हणणे आहे. या घरावर आकाशकंदील तसेच घरात मिष्टान्न नाही. चंदूचे आईवडील लहानपणीच वारल्याने त्याचे बालपण सामनेर येथे आत्या आणि काकांकडे गेले असून सरकारने चंदू चव्हाण याची सुखरुप सुटका करावी अशी अपेक्षा परिवाराने व्यक्त केली आहे.