१५.५ लाख शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा
By admin | Published: December 18, 2015 01:43 AM2015-12-18T01:43:13+5:302015-12-18T01:43:13+5:30
पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरीप हंगामातील उत्पादनावर परिणाम झाला असून, जवळपास पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक शेतमालाचे नुकसान झाल्याने पश्चिम विदर्भातील विमा
अकोला : पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरीप हंगामातील उत्पादनावर परिणाम झाला असून, जवळपास पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक शेतमालाचे नुकसान झाल्याने पश्चिम विदर्भातील विमा काढणारे साडेपंधरा लाख शेतकरी नुकसानभरपाईची प्रतीक्षा करीत आहेत. दरम्यान, विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना खरेच दिलासा द्यायचा असेल तर यापुढे पिकांचा जोखीमस्तर ६० टक्क्यांवरू न ८० टक्के करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. या हिवाळी अधिवेशनात यावर चर्चा व्हावी, अशीही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
चालू खरीप हंगामात अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील १५ लाख ४२ हजार २८८ शेतकऱ्यांनी ११ लाख ८७ हजार ७१४ हेक्टरवरील विविध खरीप पिकांचा विमा काढला. या विम्यापोटी शेतकऱ्यांनी ६६ लाख १२ हजार ३२ रुपयांचा हप्ता भरला. पावसाने दडी मारल्याने पश्चिम विदर्भातील खरीप पिकावर प्रतिकूल परिणाम झाला. मूग, उडीद व सोयाबीन पिके हातची गेली असून, कापसाचा अपेक्षित उतारा येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. म्हणूनच शेतकऱ्यांची भिस्त रबी हंगामावर होती; परंतु रबी पेरणी आणि पिकावरही परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा आधार वाटत आहे. रबी पिकांना शेतात ओलावा नाही; परंतु याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. सोयाबीनच्या शेतात हरभरा पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली. तथापि, शेतात ओलावा नसल्याने हरभरा तुरळक स्वरू पात उगवला, तर अनेक ठिकाणी पेरलेला हरभरा आलाच नाही. मुगाच्या शेतात हरभरा येतो; पण मुगाच्या शेतातही अनेक ठिकाणी हरभरा उगवला नाही. गव्हाची पेरणीदेखील लांबली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत रबी पीक विमा काढण्याची मुदत आहे; परंतु अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत अडचण येत आहे.
दरम्यान, पावसाच्या अनिश्चिततेमुळे गतवर्षी अमरावती विभागातील ३९,७२७ शेतकऱ्यांनी रबीचा पीक विमा काढला आहे. या शेतकऱ्यांना या विम्याच्या नुकसानभरपाईची अद्याप प्रतीक्षा आहे.
चालू खरीप हंगाम आणखी संपल्याने या खरीप हंगामाचा विमा हंगाम संपल्यावर मिळेलच, मागील वर्षीच्या रबी हंगामाची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे.
-शुद्धोधन सरदार, कृषी सह संचालक,
अमरावती विभाग
विमा जोखीमस्तर ६० वरू न ८० टक्के केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
-शिवाजीराव देशमुख, प्रगतिशील शेतकरी, अकोला.