धरणांना प्रतीक्षा पावसाची

By admin | Published: June 27, 2016 01:16 AM2016-06-27T01:16:35+5:302016-06-27T01:16:35+5:30

पावसाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी अद्यापही दमदार पावसाला सुरुवात झाली नाही.

Waiting for dams to rain | धरणांना प्रतीक्षा पावसाची

धरणांना प्रतीक्षा पावसाची

Next


घोडेगाव : पावसाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी अद्यापही दमदार पावसाला सुरुवात झाली नाही. यामुळे जिल्ह्यातील धरणे रिकामी असून, त्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. कुकडी प्रकल्पातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या आवर्तनामुळे या प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा राहिला आहे. येत्या काळात चांगला पाऊस न झाल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.
खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांना आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. आंबेगाव, जुन्नर, शिरूरबरोबरच सोलापूर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांतील शेती सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या कुकडी प्रकल्पातील सहा धरणांपैकी चार धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे, तर एकूण ०.४६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी ८.७२ टक्के पाणी होते. तसेच पाऊस चांगला सुरू झाला होता. मात्र, या वर्षी अवघा १७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील १० दिवसांत पाऊस न झाल्यास आणीबाणीची स्थिती निर्माण होऊ शकते.
कुकडी प्रकल्पात येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगा, डिंभे, चिल्हेवाडी ही सहा धरणे येतात. यातील माणिकडोह, पिंपळगाव जोगा, डिंभे, चिल्हेवाडी या चार धरणांमध्ये सध्या शून्य टक्के पाणीसाठा आहे. या वर्षी पाऊस कमी पडल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पुरेसे पाणी मिळाले नाही. कुकडी प्रकल्पात कुकडी, मीना, घोड, मांडवी नद्यांवर धरणे बांधण्यात आली आहेत. सध्या या नद्या पूर्ण कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे नदीवर अवलंबून असलेला शेतकरी व पाणी योजना अडचणीत सापडल्या आहेत. मंचरसारख्या मोठ्या गावातही आज पाणीटंचाई निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
चासकमान धरणात ६ टक्के पाणीसाठा
चासकमान : चासकमान धरणात पावसाअभावी पाणीसाठा ‘जैसे थे’ स्थितीत आहे. धरणात ६.२७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
चासकमान धरण पाणलोट क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवली असून, १ जूनपासून आत्तापर्यंत धरणक्षेत्रात २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत पावसाची नोंदच झाली नाही. सध्या धरणात धरणात ६.२७टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाचा पश्चिम भाग हा पावसाचे आगार म्हणून ओळखला जात असला, तरी या भागातील भात उत्पादक शेतकरी पावसाअभावी चिंताग्रस्त झाला आहे. सर्वांच्या नजरा फक्त पावसाकडे लागल्या आहेत.
(वार्ताहर)
>आंबेठाण : दोन दिवसांपासून भामा-आसखेड धरण परिसरात पडत असलेला पाऊस आज सकाळपासून मात्र उघडला होता. परंतु सायंकाळी चारनंतर मात्र तो पुन्हा पडू लागल्याने खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील बळीराजा सुखावला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात किंचितही वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. भामा-आसखेड धरण हे ८.१४ टीएमसी क्षमतेचे आहे. एक जूनपासून धरण क्षेत्रात ३२ मिली पाऊस पडला असून, त्याचा धरणाच्या पाणीसाठ्यावर मात्र किंचितही परिणाम झाला नसून, पाणीसाठा आहे तितकाच आहे. धरणात सध्या जवळपास १.५ टीएमसी पाणीसाठा आहे. तो १८.६३ टक्के इतका आहे.
>इंदापूर : पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणात सद्य:स्थितीत केवळ वजा २८.१८ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी आतापर्यंत धरण क्षेत्रात १६६ मिमी पाऊस झाला आहे. इंदापूर तालुक्यात सरासरी पाऊस ३४ टक्के झाला आहे. पुण्यात चांगला पाऊस झाला, तरच उजनीतील पाणी वाढेल.
>धरणातील पाणी पातळी (४८५.९२२/ १२०.९६ मीटर), एकूण साठा -(३५. ४७ दशलक्ष घनमीटर, उपयुक्त पाणीसाठा -(वजा ७९८.०९/ वजा २८.१८), टक्केवारी -(वजा ५२. ६० टक्के), बाष्पीभवन ३.८० मिमी

Web Title: Waiting for dams to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.