दीपक घाडगे यांच्या पार्थिवाची प्रतीक्षा
By admin | Published: March 10, 2017 11:31 PM2017-03-10T23:31:49+5:302017-03-10T23:31:49+5:30
फत्यापूर शोकसागरात; पंचक्रोशीत श्रद्धांजली वाहणारे भावनिक फलक
अंगापूर : पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यांच्या गोळीबारात शहीद झालेले फत्यापूर येथील जवान दीपक जगन्नाथ घाडगे यांच्या पार्थिवाची प्रतीक्षा ग्रामस्थांना लागली आहे. जम्मूमध्ये शुक्रवारीही हिमवृष्टी सुरू असल्याने पार्थिव आणण्यात अडथळे आले. त्यामुळे शनिवारी दुपारपर्यंत त्यांचे पार्थिव गावी येण्याची शक्यता आहे. .
शासकीय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी फत्यापूरला येऊन घाडगे कुटुंबीयांचे सांत्वन केले. गावावर शोककळा पसरली असली तरीही गावकऱ्यांनी एकमेकांना धीर देत अंत्यविधी जागेच्या सपाटीकरणाचे काम सुरू केले. तसेच गावातील रस्त्यांची साफसफाई केली. पंचक्रोशीत ठिकठिकाणी ‘शहीद दीपक घाडगे वीर जवान अमर रहे...’ असे श्रद्धांजलीचे फलक लावले गेले आहेत.
दरम्यान, जिल्हा सैनिक बोर्डाचे राजेंद्रकुमार जाधव, चंद्रकांत पवार, मराठा रेजिमेंटचे हवालदार संजय घोरपडे, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, प्रभारी तहसीलदार स्मिता पवार, बोरगावचे पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर, उपसरपंच अरविंद घाडगे यांनी दीपक घाडगे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी आई-वडिलांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. दरम्यान, शहीद दीपक घाडगे यांचे पार्थिव शनिवारी दुपारपर्यंत फत्यापूरला आणले जाण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. (प्रतिनिधी)
महिनाभरापूर्वीच
आले होते गावी
दीपक हे २०१० मध्ये कोल्हापूर येथील सैन्य भरतीतून १५ मराठा लाईफ इनफन्ट्रीमध्ये भरती झाले. बेळगाव येथे सहा महिन्यांचे प्रशिक्षण झाल्यावर जम्मूत दोन वर्षे व अहमदाबाद येथे चार वर्षे सेवा बजावली.
दीपक यांना दोन मुले असून, मुलगा शंभूराज हा तीन वर्षांचा तर मुलगी परी ही एक वर्षाची आहे. दीपक हे गेल्या महिन्यातच गावी रजेवर आल्यावर पुन्हा जम्मू-काश्मीर मधील पूँछ सेक्टरमध्ये रूजू झाले.
सुटीसाठी गावी आल्यावर ते जास्तीत जास्त वेळ कुटुंबासाठी देत. आईच्या प्रत्येक कामात हातभार लावत. प्रत्येक महत्त्वपूर्ण कामासाठी आईला सोबत घेऊन निर्णय घ्यायचे.
आई-वडिलांनी विकला भाजीपाला
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वडील जगन्नाथ यांनी मोलमजुरी करून तर आई शोभा यांनी आठवडी बाजारात भाजीपाला विकून मुलगी माया व मुलगा दीपक यांना लहानाचे मोठे केले. दीपक यांचे पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण फत्यापूरला, माध्यमिक शिक्षण खोजेवाडीच्या महाराष्ट्र हायस्कूलमध्ये तर उच्च माध्यमिक शिक्षण मिलिटरी अपशिंगेच्या श्री छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले.
आई, पत्नीच्या मनावर आघात
दीपक हे शहीद झाल्याचे समजल्यापासून पत्नी निशा व बहीण माया यांच्या मनावर आघात झाला आहे. त्या दोघीही नि:शब्द झाल्या आहेत. तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून आई व पत्नीला घरामध्येच सलाईन लावून उपचार केले.
बहीण पोलिस; भाऊजी सैन्यात
दीपक घाडगे यांच्या भगिनी माया या सातारा पोलिसांत कार्यरत असून, त्यांचे पती
सैन्यात देशाची सेवा बजावत आहेत. या दोघांचा आदर्श घेतच दीपक हेही सुद्धा सैन्य दलात भरती झाले होते.