महावितरणच्या विभाजनाची प्रतीक्षा
By admin | Published: June 1, 2017 02:32 AM2017-06-01T02:32:46+5:302017-06-01T02:32:46+5:30
महावितरणच्या वाघोली शाखा कार्यालयाचे विभाजन करून वाघोली १, वाघोली २ व वाघोली ग्रामीण या शाखा कार्यालयांच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वाघोली : महावितरणच्या वाघोली शाखा कार्यालयाचे विभाजन करून वाघोली १, वाघोली २ व वाघोली ग्रामीण या शाखा कार्यालयांच्या निर्मितीसंदर्भात २0१५ साली पाठविलेला प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात २ वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे. जवळपास ३८ हजार ग्राहकसंख्या असलेल्या वाघोली शाखेत फक्त १३ कर्मचारी काम करत असल्याने वीज कर्मचारी, कनिष्ठ अभियंत्यांसह, उपकार्यकारी अभियंत्यांवर पडणारा कामाचा ताण हटविण्यासाठी विभाजनास वरिष्ठ कार्यालयाने त्वरित मंजुरी द्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.
मुळशी विभागातील हडपसर ग्रामीण उपविभागांतर्गत वाघोली, पेरणे, फुरसुंगी, उरुळी देवाची ही चार शाखा कार्यालये येतात. यामध्ये वाघोली शाखा सर्वाधिक वेगाने वाढणारे कार्यालय असून वाघोली, लोणीकंद, केसनंद, मांजरी, बकोरी, आव्हाळवाडी, तळेरानवाडी आदी गावे समाविष्ट आहेत.
सद्य:स्थितीत या शाखा कार्यालयांची ग्राहकसंख्या ३८ हजार आहे, तर दर वर्षी सरासरी २० टक्के ग्राहकसंख्या वाढते. ग्राहकसंख्या जास्त असल्याने सध्या कार्यरत असलेल्या १ अधिकारी १३ कर्मचारी, ४ बाह्यमदत कर्मचारी यांच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा पडत आहे.
ग्राहकांच्या सोयीसाठी व महसूल वाढीसाठी सध्या वाघोली कार्यालयाचे विभाजन करून वाघोली १, वाघोली २ व वाघोली ग्रामीण ही नवीन शाखा कार्यालय मंजूर करण्यात यावी, असा प्रस्ताव २०१५ साली कार्यकारी अभियंता, पुणे ग्रामीण अधीक्षक अभियंता, पुणे परिमंडळ मुख्य अभियंता यांच्याकडून मुख्य महाव्यवस्थापक यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.
या प्रस्तावाबाबत महावितरण कंपनीने सुधारित पदाबाबतच्या पुनर्विलोकनाची व ग्राहक मानके पुनर्गठीत करण्याची कार्यवाही सुरु केलेली असून, कर्मचारी तसेच ग्राहक मानके निश्चित झाल्यानंतर उचित कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी पत्राद्वारे मुख्य व्यवस्थापकांनी पुणे परिमंडल मुख्य अभियत्यांना जानेवारी २०१७मध्ये कळविले आहे. विभाजनासाठी आस्थापनेबाबतची लेखी माहिती कळविण्याव्यतिरिक्त कोणतेही ठोस पाऊल अद्याप उचलले गेले नाही.
शाखांचे विभाजन लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी नागरिक व स्थानिक लोकप्रतिनिधी करीत आहेत.
कर्मचाऱ्यांच्या येते नाकीनऊ
सध्या कार्यरत वाघोली शाखा कार्यालयामध्ये वीज पुरवठा संदर्भात कामे, वाढीव वीज बिल तक्रारी, नवीन वीजजोड कामे घेवून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. कनिष्ठ अभियंत्यांचे कार्यालय दररोज गर्दीने फुल्ल होत आहे. यामुळे कर्मचारी वगार्ला ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना नाकी नऊ येत आहे.
आमदारांनी
लक्ष द्यावे
शिरूर हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी वाघोलीतील वाढत्या ग्राहक संख्येमुळे शाखेचे विभाजन करण्यात यावे, अशी मागणी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती.
परंतु, अद्यापही कार्यालय विभाजन झाले नसल्याने नागरिक व महावितरण अधिकाऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी आमदारांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.