निकालासाठी प्रतीक्षा कायम
By admin | Published: August 4, 2014 12:50 AM2014-08-04T00:50:45+5:302014-08-04T00:50:45+5:30
विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेचे निकाल केव्हा जाहीर होणार हे अद्याप निश्चित नाही. विद्यापीठानेही याबाबत हात वर केले आहेत.
उन्हाळी परीक्षा : विद्यापीठाचे हात वर
नागपूर: विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेचे निकाल केव्हा जाहीर होणार हे अद्याप निश्चित नाही. विद्यापीठानेही याबाबत हात वर केले आहेत.
शनिवारी यासंदर्भात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, शिक्षक नसल्याने अडचणी येत आहे. विद्यापीठात विद्यार्थी आणि अभ्यासक्रमांची संख्या वाढली आहे. उत्तर पत्रिकांची संख्याही वाढली. मात्र त्या तुलनेत शिक्षकांची संख्या कमी आहे. परिणामी निकाल जाहीर होण्यास विलंब लागू शकतो. ही समस्या लवकरच दूर होईल. सर्व महाविद्यालयांना ५० टक्के शिक्षकांची पदे भरण्याचे आदेश दिले आहे.
दरम्यान शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयांना पुरेसा वेळ देण्यात आला आहे. या काळात शिक्षक नियुक्त होईलच याबाबत खात्री नाही. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ नुसार ४५ दिवसाच्या आत निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. परंतु अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल दोन महिन्यापासून प्रलंबित आहेत. यासंदर्भात बोलताना देशपांडे म्हणाले की, आता ‘सेमिस्टर पॅटर्न’ लागू आहे. यात हा नियम लागू होत नाही. (प्रतिनिधी)
शिक्षकांवर कारवाई का नाही
जून महिन्यात विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांनी उत्तर पत्रिका मूल्यांकन न करणाऱ्या शिक्षकांना नोटीस पाठविल्या होत्या व कारवाईचा इशारा दिला होता. मात्र एकाही शिक्षकावर कारवाई झाली नाही. याबाबत डॉ. देशपांडे यांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर काहीही उत्तर दिले नाही.
असा होणार परिणाम
उशिरा निकाल जाहीर होण्याचा फटका पुनर्मूल्यांकनालाही बसू शकतो. अद्याप हिवाळी परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनाचे निकाल विभागाने जाहीर केले नाहीत. हिवाळी परीक्षांवरही याचा परिणाम होऊ शकतो. विशेषत: सेमिस्टर अभ्यासक्रमाच्या परीक्षांना याचा फटका बसू शकतो. निकाल लांबल्याने सर्वच सेमिस्टर अभ्यासक्रमाची परीक्षा डिसेंबरपर्यंत लांबू शकते. ही परीक्षा आॅक्टोबरमध्ये व्हायला हवी.