अध्यादेशावर राज्यपालांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 05:34 AM2019-05-20T05:34:51+5:302019-05-20T05:35:05+5:30

वैद्यकीय विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच : खुल्या गटातील विद्यार्थी आणि सीईटी सेलचेही लक्ष

Waiting for the Governor's signature on the Ordinance | अध्यादेशावर राज्यपालांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा

अध्यादेशावर राज्यपालांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा

Next

मुंबई : राज्य सरकारने वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणातील मराठा आरक्षणानुसार झालेले प्रवेश कायम करण्यासाठी अध्यादेश काढला असून, तो राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आला आहे. या अध्यादेशावर स्वाक्षरी झाल्यानंतरच सरकार त्याची अधिसूचना काढणार आहे, पण या अध्यादेशात नेमके काय आहे, याची माहिती अद्याप कोणालाच नसल्याने मराठा विद्यार्थी, खुल्या गटातील विद्यार्थी, पालक तसेच सीईटी सेल यांचे लक्ष लागून आहे.


एकीकडे हा अध्यादेश लागू झाल्यानंतर त्या संदर्भातील प्रवेश निश्चितीची सूचना सीईटी किंवा वैद्यकीय संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतरच मराठा आंदोलक विद्यार्थी आपले आंदोलन मागे घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या आझाद मैदानात मराठा आंदोलक विद्यार्थी ठाण मांडून आहेत. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले असले, तरी आमचा लढा योग्य दिशेने सुरू आहे. सरकारने हा अध्यादेश काढण्यात योग्य ती दक्षता घेतली असल्यास, तो निश्चितच न्यायालयातही टिकेल, अशी आशा मराठा आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
अध्यादेशात नेमके काय आहे, खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने नेमकी काय तजवीज केली आहे, या सगळ्यांची माहिती घेतल्यानंतरच आपण न्यायालयात जायचे की नाही, याचा निर्णय खुल्या गटातील विद्यार्थी पालक घेणार आहेत.


खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी व अभिमत विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचे अध्यादेशात जाहीर करण्यात आले आहे, ते आम्हाला मान्य नसल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या आम्ही विरोधात नाही. मात्र, ते लागू करण्यापूर्वी जागा वाढविणे आवश्यक होते. चांगले गुण मिळूनसुद्धा चांगले महाविद्यालय मिळत नाही, असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला.

आजच्या निकालाबाबत उत्सुकता
वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेत, प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासन मुदतवाढ मागणार असल्याने, १३ मे पासून पुढील ७ दिवस प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवली होती. ही स्थगिती सोमवारी संपणार असली, तरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील जागांसाठीच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी आहे. त्यामुळे हा निकाल आणि अध्यादेश नेमका काय आहे, याची वाट आपण पाहत असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीची मुदत आता ३१ मेपर्यंत वाढवून दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

Web Title: Waiting for the Governor's signature on the Ordinance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.