जावईबापूंना आमंत्रणाची प्रतीक्षा
By admin | Published: June 17, 2015 01:19 AM2015-06-17T01:19:18+5:302015-06-17T01:19:18+5:30
जावईबापूंच्या स्वागताचा आणि दान-धर्मासाठी शुभ असणाऱ्या अधिक महिन्याला बुधवारपासून ( दि. १८) सुरुवात होत आहे.
पिंपरी : जावईबापूंच्या स्वागताचा आणि दान-धर्मासाठी शुभ असणाऱ्या अधिक महिन्याला बुधवारपासून ( दि. १८) सुरुवात होत आहे. त्यामुळे जावई खुशीत असून, सासऱ्यांच्या आमंत्रणाची वाट पाहत आहेत.
तीन वर्षांमधून एकदा हा महिना येतो. पंचांगाप्रमाणे चंद्रमासाचे ३५५ दिवसांचे वर्ष असते. परंतु, इंग्रजी वर्ष ३६५ दिवसांचे असते. प्रतिवर्षी ११ दिवस चंद्रमास सौर वर्षापेक्षा कमी असतो. प्राचीन शास्त्रानुसार जर तीन वर्षांनी किंवा पंचागातील अचूक माहितीप्रमाणे ३२ महिने १६ दिवसांनी एक महिना अधिक येतो. या काळात सूर्याची गती मंद असते. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सूर्याला ३० दिवसांपेक्षा कमी कालावधी लागतो. या काळाला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते.
या वर्षी या महिन्याला बुधवारपासून (दि. १७) सुरुवात होत आहे. तर १६ जुलैला हा महिना संपणार आहे. या काळात मुलगी आणि जावयाला लक्ष्मी-नारायणाचा जोडा समजले जाते. जावईसाठी ३३ अनारसे एका पेटीत तयार केले जातात आणि चांदीच्या भांड्यामध्ये ठेवून त्यांना दिले जातात. या काळात मोठ्या प्रमाणात दानधर्म करण्याची प्रथा आहे. परंतु, ‘हाय-फाय’ जमान्यामध्ये या महिन्यात जावईबापूंची चांगलीच बडदास्त ठेवली जाते. त्यांना सासरी बोलावून सोन्याच्या वस्तू दान
म्हणून दिल्या जातात. त्यांच्यासाठी पंचपक्वान्नाचे जेवण ठेवले
जाते. गेल्या महिन्यातच लग्न झालेल्यांना अधिक महिन्यामुळे सासऱ्याच्या पाहुणचाराची नामी संधी मिळाली आहे.
या महिन्यामध्ये पुरणाचे दिंड करून मित्रांना वाटले जातात. तसेच पुरणपोळीचे जेवणही दिले जाते. पुरणाच्या दिंडांना ‘धोंडा’ असे म्हटले जाते. त्यामुळे हा महिना धोंडा महिना म्हणूनही ओळखला जातो. या महिन्यामध्ये गावांमध्ये हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्यात कीर्तन, प्रवचनाचा समावेश असतो. तीर्थयात्रा काढल्या जातात. गावातील प्रतिष्ठित कुटुंबे मोठ्या प्रमाणात अन्नदान करतात. (प्रतिनिधी)
खरेदीला वावडे
या महिन्यामध्ये जमीन, घर, सोने यांसारख्या वस्तू खरेदी केल्या जात नाहीत. त्यामुळे दुकानदारांच्या दृष्टीने हा महिना तंगीचा महिना म्हणून ओळखला जातो.
नवविवाहिता माहेरी
नवविवाहित महिलांना या महिन्यांमध्ये काही दिवस माहेरी पाठविण्याची प्रथा आहे. यामुळे त्यांना माहेरपणाचा आनंद घेता येतो.