एमपीएससी उत्तीर्ण होऊनही नोकरीची प्रतीक्षा
By Admin | Published: October 15, 2016 03:19 AM2016-10-15T03:19:19+5:302016-10-15T03:19:19+5:30
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) खडतर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही ६५ विद्यार्थी अद्याप नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत.
मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) खडतर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही ६५ विद्यार्थी अद्याप नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. एमपीएससीकडून अधिव्याख्याता इंग्रजी व शासकिय तंत्रनिकेतन शिक्षक या पदांवर सरळ सेवेत घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी आझाद मैदानात सोमवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे.
यामधील शिल्पा सोनवणे यांनी सांगितले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिव्याख्याता इंग्रजी, शासकीय तंत्रनिकेतन, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट(अ) या पदांसाठी २०१४ साली परीक्षा झाली. त्यासाठी हजारो उमेदवार प्रविष्ठ झाले होते. मात्र केवळ ८७ उमेदवारांना पात्र ठरवण्यात आले. त्यानंतर या उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यांपैकी २२ उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या. तर ६५ उमेदवार अद्यापही नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निकालात कंत्राटी अधिव्याख्यातांना कायम सेवेत घेतल्याने हा घोळ झाल्याचेही सोनवणे यांनी सांगितले.
सरकारने नियुक्ती द्यावी, म्हणून उमेदवारांनी वर्षभर वाट पाहिली. मात्र त्यानंतरही सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने, उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे (मॅट) धाव घेतली. तिथे लवकर न्याय मिळत नसल्याने उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले. मात्र त्यांच्याकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याने अखेरचा पर्याय म्हणून उमेदवारांनी आझाद मैदानात साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. (प्रतिनिधी)