पर्यटकांसह साऱ्यांनाच प्रतीक्षा मिनीट्रेनची...
By Admin | Published: March 3, 2017 02:27 AM2017-03-03T02:27:22+5:302017-03-03T02:27:22+5:30
दहा महिन्यांपासूनच अनिश्चित काळासाठी बंद असल्याने गाडी सुरू होईल की नाही, या विवंचनेत स्थानिक नागरिक सध्या दिसत आहेत
मुकुंद रांजाणे,
माथेरान- माथेरानची शान आणि आकर्षण असलेली नॅरोगेज मिनीट्रेन मागील दहा महिन्यांपासूनच अनिश्चित काळासाठी बंद असल्याने गाडी सुरू होईल की नाही, या विवंचनेत स्थानिक नागरिक सध्या दिसत आहेत. मात्र, पर्यटकांमध्ये गाडी लवकरच सुरू व्हावी, ही उत्सुकतादेखील पाहावयास मिळत आहे.
मे २०१६मध्ये एकाच जागी दोनदा गाडीची बोगी घसरल्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तडकाफडकी ही सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा कठोर निर्णय घेतल्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही सेवा ताबडतोब सुरू करण्यात यावी, यासाठी येथील राजकीय मंडळींनीही रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित मंत्र्यांचे उंबरठे झिजविले; परंतु अद्याप या कामासाठी गती मिळालेली नाही. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचीसुद्धा प्रत्यक्ष दिल्ली दरबारी, मुंबई येथे भेट घेऊन लेखी निवेदने दिलेली आहेत; परंतु आश्वासनांशिवाय काहीच प्राप्त झालेले नाही. मध्यंतरी काही भागात सुरू असलेली कासव गतीची कामेसुद्धा बंद पडल्याने मिनीट्रेन मे महिन्याच्याअखेरपर्यंत तरी सुरू होईल की नाही, याच विवंचनेत स्थानिक आहेत. पर्यटन हंगाम समीप येत आहे. त्यामुळे या गाडीच्या आधारावर सर्वांची आर्थिक व्यवहारांची मदार आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते ही गाडी २० कोटी रु पये तोट्यात गेलेली आहे; परंतु सन २०१० ते २०१६ याच कालावधीत या गाडीच्या एकूण ३५८४ फेऱ्या तांत्रिकदृष्ट्या रद्द करण्यात आल्याचे समजते. एकावेळेस दीडशे प्रवासी वाहण्याची क्षमता असणाऱ्या या गाडीच्या जेमतेम चार ते पाच फेऱ्या होत असत. त्यामुळे हा तोटा रेल्वेच्याच अनागोंदीमुळे त्यांनाच सोसावा लागलेला आहे. गाडीची सेवा बंद करून नाहक भुर्दंड प्रवाशांच्या माथी का लादला जात आहे, अस संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
नेरळ -माथेरान या अवघड डोंगर माथ्यातून कडवे आव्हान स्वीकारून आदमजी पिरभॉय आणि अब्दुल हुसैन आदमजी पिरभॉय या पितापुत्रांनी सन १९०१ ते १९०७ या केवळ सात वर्षांत चौदा किलोमीटरचा रेल्वेमार्ग बनवून स्वखर्चाने त्याकाळी १६ लाख रु पये खर्चून रेल्वे प्रशासनाला ही गाडी पर्यटकांच्या सेवेसाठीच बहाल केली होती; परंतु रेल्वे प्रशासनाला या मार्गावर असणारे सूतभर कामसुद्धा जलदगतीने करता येत नाही. अपघात हे होतच असतात म्हणून काही रेल्वे सेवा बंद होत नाही, असे माथेरानकरांसह पर्यटकांचे म्हणणे आहे.गाडी लवकरच सुरू करून पर्यटकांना सेवा द्यावी, अशी मागणी होत आहे.
>देशात एकूण ११००० रेल्वेगाड्या नियमितपणे धावतात. यामध्ये सात हजार पॅसेंजर, तर ४००० मालगाड्या धावतात. यातून कोट्यवधी रु पये उत्पन्न मिळते, त्याप्रमाणेच मिनीट्रेनच्या माध्यमातूनही मिळते, मग ही सेवा बंद का? असा संतप्त प्रश्न स्थानिकांसह पर्यटकांकडून विचारण्यात येत आहे.