मान्सूनची प्रतीक्षाच!
By admin | Published: June 14, 2016 03:04 AM2016-06-14T03:04:28+5:302016-06-14T03:04:28+5:30
राज्यात मान्सून येण्यास अजूनही अनुकुल स्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांना अजून थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पुणे : राज्यात मान्सून येण्यास अजूनही अनुकुल स्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांना अजून थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
मान्सून ११ जूनला महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज अगोदर भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला होता. मात्र अनुकुल परिस्थिती निर्माण न झाल्याने अजून दोन-तीन दिवस तरी प्रतिक्षाच करावी लागणार असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, राज्यात कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी चांगला मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. सोमवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत रत्नागिरीमध्ये सर्वाधिक १०१ मिमी पाऊस झाला. गेल्या २४ तासात विदर्भातील भिवापूर येथे ५० मिमी, मराठवाड्यातील बिलोली, परांडा येथे पत्येकी ५० मिमी पाऊस पडला. त्यापाठोपाठ म्हापसा, सांगे,तीतोरा येथे ४०, देवगड, मालवण, राजापूर, ब्रम्हपूरी, ईटापल्ली, लाखांदूर, मूलचेरा येथे ३०, भिरा, गुहाघर, कणकवली, कुडाळ, मुरूड, रोहा, सावंतवाडी, पाली, वैभववाडी, वेंगुर्ला, माढा, मोहोळ, पंढरपूर, भूम, अहिरी, आरमोरी, बल्लारपूर, तुमसर येथे २०, हर्णे, श्रीवर्धन, जेऊर, महाबळेश्वर, अंबेजोगाई, पाटोदा, शिंदेवाही येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
पाऊस येण्यास उशीर होत असल्याने विदर्भ, खान्देशामधील तापमान अजूनही चढेच आहे. आज राज्यात सर्वाधिक ४२.७ अंश सेल्सिअस तापमान उपराजधानी नागपूर येथे नोंदविले गेले. त्याव्यतिरिक्त जळगाव, अमरावती, ब्रम्हपूरी, चंद्रपूर, गोंदिया आणि वर्धा येथील तापमान ४० अंशाच्या वर
होते. (प्रतिनिधी)
मॉन्सून कारवारमध्येच...
अंदमानसह पश्चिम बंगालच्या उपसागरात वेगाने दाखल झालेला मॉन्सून केरळ, तामिळनाडू ओलांडल्यानंतर अद्यापही कारवारमध्येच रेंगाळला आहे. मॉन्सून पुढे सरकरण्यासाठी येथील परिस्थिती अनुकूल असली तरी येत्या ४८ तासांत त्याचा प्रवास मध्य व उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागांत, ईशान्यकडील काही राज्ये, उप-हिमालयाचा पश्चिम बंगाल भाग आणि सिक्कीमच्या काही भागांकडे होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.
परिणामी मान्सूनच्या महाराष्ट्र आगमनाबाबत अद्यापही अनिश्चितता असल्याने राज्याला पावसाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. मुंबईसह राज्यात मान्सूनपूर्व सरी कोसळत असल्या तरी राज्याला मॉन्सूनची प्रतीक्षा आहे. मागील २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. तर कोकण, गोवा आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात वाढ झाली.
मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मुंबईचा विचार करता येथेही मॉन्सूनपूर्व सरींनी विश्रांती घेतली असून, उकाड्यातील वाढ कायम आहे. परिणामी मुंबईकर ऊकाड्याने हैराण असून, येत्या ४८ तासांत मुंबई आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडेल.